आयपीएल सामन्यांदरम्यान होणारी पाण्याची नासाडी पाहता, अकराव्या हंगामातील सामन्यांवर बंदी घालण्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादापुढे दाखल करण्यात आलेली आहे. राजस्थानच्या अलवर शहरात राहणाऱ्या हैदर अली या युवकाने हरित लवादापुढे ही याचिका दाखल केल्याचं समजतंय. न्या. जावेद रहिम यांनी हैदर अलीच्या याचिकेवर केंद्रीय जलसंधारण मंत्रालय, बीसीसीआय आणि ९ राज्यांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे.

अवश्य वाचा – IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

हरित लवादाने सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिलेला असून या प्रकरणात पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे हरित लवादाच्या नोटीसीवर संबंधीत यंत्रणा आपली काय बाजू मांडतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. याआधीही महाराष्ट्रात पसरलेला दुष्काळामुळे, राज्यातील आयपीएल सामने बाहेर हलवण्यासंदर्भात याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ज्यावर न्यायालयाने सकारात्मक निर्णयही दिला होता.

मैदानांची निगा राखणे व अन्य खासगी गोष्टींसाठी आयपीएल सामन्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. देशातल्या अनेक भागांमध्ये अजुनही पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना ही नासाडी बरोबर नाही अशी भूमिका हैदर अली या युवकाने आपल्या याचिकेतून मांडली आहे. ७ एप्रिलपासून सुरु होणारे अकराव्या हंगामाचे आयपीएल सामने हे देशभरात ९ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. ५१ दिवसांमध्ये तब्बल ६० सामने खेळवले जाणार असल्यामुळे, यातून होणाऱ्या नासाडीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन भविष्यात याचे वाईट परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतील असंही हैदर अलीने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.