आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर, अकराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्स संघातील भारतीय खेळाडूंनी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडीयमवर ३ दिवसांच्या सराव शिबीरामध्ये सहभाग घेतला आहे. झुबीन भरुचा यांच्या देखरेखीखाली १० खेळाडू सध्या सुरु असलेल्या शिबीरात सराव करणार आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि शाररिक तंदुरुस्ती या सर्व गोष्टींवर या शिबीरात लक्ष दिलं जाणार आहे.

अकराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने काही महत्वाच्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा १२.५ कोटींच्या बोलीमध्ये यंदाच्या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर जयदेव उनाडकट ११.५ कोटींच्या बोलीवर सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरलाय. IANS ने दिलेल्या बातमीनुसार नुकताच आफ्रिका दौऱ्यावरुन भारतात परतलेल्या अजिंक्य रहाणेने ब्रेबॉन स्टेडीयमवरील या सराव शिबीराला भेट दिली आहे. यावेळी अजिंक्यने तरुण खेळाडूंना मार्गदर्शनही केलं.

सध्या राजस्थान क्रिकेट असोसिएशनने, रॉयल्स संघव्यवस्थापनाला मैदान दिलेलं नसल्यामुळे खेळाडूंना मुंबईत सराव करावा लागतो आहे. या सरावाचे काही व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले आहेत.

२००७ साली शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या पहिल्या हंगामाचं विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला आगामी हंगामांमध्ये हवीतशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यातचं स्पॉट फिक्सिंग प्रकरणात संघावर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा लादण्यात आल्याने संघाची चांगलीच बदनामी झाली. त्यामुळे आता नवीन वर्षात राजस्थानचे खेळाडू कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.