काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव पार पडला. मात्र २०१७ च्या हंगामातली आपली निराशाजनक कामगिरी टाळण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने यंदा फार सावध पद्धतीने पावलं टाकायचं ठरवलं आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं संघव्यवस्थापन काही खेळाडूंना स्पर्धेआधी यो-यो टेस्ट पास करणं बंधनकारक करु शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवन नेगी, नवदीप सैनी आणि कुलवंत खेजरोलिया या खेळाडूंना यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे.

आगामी हंगामासाठी आपले सर्व खेळाडू शाररिक दृष्ट्या तंदुरुस्त रहावे असा बंगळुरु प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. यासाठीच यो-यो टेस्ट बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. आयपीएलआधी भारतीय क्रिकेट संघात निवड होण्यासाठी बीसीसीआयने यो-यो टेस्ट पास करण्याची अट सर्व खेळाडूंना घातली होती. युवराज सिंह आणि सुरेश रैनासारखे खेळाडू काही काळ यो-यो टेस्ट पास न केल्यामुळे संघाबाहेर राहिले होते.

अवश्य वाचा – हातात दगडाऐवजी बॅट-बॉल घ्या, काश्मिरी खेळाडूच्या आयपीएल निवडीवरुन मोहम्मद कैफचं भावनिक आवाहन

आयपीएलच्या अकराव्या हंगामाची सुरुवात ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही खेळाडूंनाच यो-यो टेस्ट बंधनकारक केल्यामुळे बंगळुरुच्या गोटात काहीशी नाराजी आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर बंगळुरुच्या संघात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पहावं लागणार आहे.