आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनराईजर्स हैदराबादवर विजय मिळवला असला तरी अमित मिश्राच्या रडीच्या डावावर टीका होत आहे. अमित मिश्रा वेगळया पद्धतीने बाद झाला. धाव घेताना खेळपट्टीवर क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण केल्याबद्दल त्याला बाद ठरवण्यात आले. अशा प्रकारे बाद होणारा या मोसमातील तो पहिला फलंदाज ठरला आहे.

दिल्लीच्या डावातील शेवटच्या षटकात ही घटना घडली. अमित मिश्रा धाव घेताना बरोबर खेळपट्टीच्या मधोमध होता. बाद करण्यासाठी फेकलेला चेंडू त्याच्या शरीराला लागला. अमित मिश्राचा स्टम्पच्या दिशेने जाणारा चेंडू अडवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे कळत होता. अमित मिश्राला बाद ठरवताना पंचही गोंधळलेले होते. हैदराबादच्या संघाने अडथळा निर्माण केल्याबद्दल त्याला बाद ठरवण्याचे अपील केले होते. पण पंचांनी झेलबादचे अपील समजून त्याला नाबाद ठरवले.

पण हैदराबादने क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण केल्याबद्दल बाद ठरवण्याचे अपील केले. अमित मिश्राने एकेरी धाव घेताना दिशा बदलल्याचे स्पष्टपणे दिसत होते. चेंडू त्याच्या हाताला लागला होता. अखेर पंचांनी त्याला अडथळा निर्माण केल्याबद्दल बाद ठरवले.

दिल्लीला विजयासाठी तीन चेंडूत २ धावांची गरज होती. खलील अहमद गोलंदाजी करत होता. खलील अहमदने टाकलेल्या चेंडूवर मिश्राने बॅट फिरवली पण चेंडू बॅटला लागला नाही. मिश्रा आणि किमो पॉलने सिंगलसाठी धाव घेतली. यष्टीरक्षक सहाने पॉलला बाद करण्यासाठी स्टम्पच्या दिशेने बॉल फेकला. तो चेंडू स्टम्पऐवजी खलीलच्या हातात गेला. खलीलने मिश्राला बाद करण्यासाठी नॉनस्ट्राइकला चेंडू फेकला पण तो चेंडू मिश्राला लागला.

मिश्राने एकेरी धाव घेताना स्टम्पच्या दिशेने येणाऱ्या चेंडूला रोखण्यासाठी दिशा बदलल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे पंचांनी त्याला बाद ठरवले. याआधी २०१३ साली पुणे वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या युसूफ पठाणला अशाच पद्धतीने बाद ठरवण्यात आले होते.