आयपीएलच्या बाराव्या हंगामात, कोलकाता नाईट रायडर्स संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ २०३ धावांपर्यंत मजल मारु शकला. आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

आंद्रे रसेलने २५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान आंद्रे रसेलने आपला विंडीजचा सहकारी ख्रिस गेलसमोर एक तगडं आव्हान निर्माण केलं आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रसेलने गेलला आव्हान दिलं आहे.

२०११ ते २०१३ या काळात ख्रिस गेलने सर्वाधिक षटकार खेचत हा विक्रम आपल्या नावे केला होता. यंदाच्या हंगामात रसेलच्या नावावर ३९ षटकार जमा आहेत. आतापर्यंत आयपीएलचा बारावा हंगाम मध्यावर आला असल्यामुळे आगामी सामन्यांमध्ये रसेल गेलचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
याचसोबत आयपीएलच्या इतिहासामध्ये आंद्रे रसेलने सर्वोत्तम स्ट्राईक रेटची नोंद केली आहे.

सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडलं. यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. नितीश आणि रसेल या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. नितीश राणाने नाबाद ८५ तर रसेलने ६६ धावा केल्या.