ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अॅश्टन टर्नरच्या मागे टी-२० क्रिकेटमागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्ह दिसतं नाहीये. टी-२० क्रिकेटमध्ये सलग पाच सामन्यांमध्ये शून्यावर बाद होणारा टर्नर पहिला खेळाडू ठरला आहे. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात टर्नर सलग पाचव्यांदा शून्यावर माघारी परतला.

दिल्लीविरुद्ध सामन्यात इशांत शर्माच्या गोलंदाजीवर टर्नर पहिल्याच चेंडूवर सोपा झेल देऊन माघारी परतला. टर्नर सलग पाच सामन्यांपैकी ३ वेळा आयपीएलमध्ये, एकदा भारताविरोधात आणि एकदा बिग बॅश लीगमध्ये शून्यावर बाद झाला आहे. मात्र वन-डे क्रिकेटमध्ये त्याचा धडाकेबाज फॉर्म कायम आहे, तरीही ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात टर्नरला स्थान मिळालेलं नाहीये.

दरम्यान, ऋषभ पंतची (७८) दणकेबाज नाबाद खेळी आणि शिखर धवनचे (५४) अर्धशतक यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानला ६ गडी राखून पराभूत केले. सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या नाबाद १०५ धावा आणि कर्णधार स्मिथचे दमदार अर्धशतक याच्या जोरावर राजस्थानने २० षटकात ६ बाद १९१ धावा ठोकल्या आणि दिल्लीला १९२ धावांचे आव्हान दिले होते. पण पंतच्या फटकेबाजीने दिल्लीला ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.