IPL २०१९ च्या हंगामासाठी डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यंदाच्या हंगामासाठी कोणत्या खेळाडूवर ‘दाव’ लावायचा? किंवा कोणत्या खेळाडूला संघातून सोडचिठ्ठी द्यायची? यासाठी सर्व संघमालक आणि सहाय्यक स्टाफ हे प्रत्येक सामन्यावर नजर ठेवून आहेत. या दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे IPL मधील दोन संघ आपल्याकडे असलेल्या खेळाडूंच्या बळावर एकमेकांशी ट्विटरवॉर करण्यात दंग असल्याचे दिसून आले होते. याच चर्चेत आता चेन्नईच्या संघानेदेखील भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा फोटो कल्पकतेने वापरून उडी घेतली आहे.

मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पांड्या याने एक फोटो सर्वप्रथम ट्विट केला होता. त्यात हार्दिक, फिरकीपटू कृणाल पांड्या आणि विंडीजचा धडाकेबाज खेळाडू कायरन पोलार्ड हे होते. हा फोटो कोट करत मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केला. या फोटोवर ‘आपल्या संघासाठी चांगले अष्टपैलू त्रिकुट शोधा. आम्ही वाट पाहू’, असे कॅप्शन टाकले होते.

यावर हैदराबादच्या संघाने मोहम्मद नबी, रशीद खान आणि शाकिब अल हसन या तिघांचा फोटो ट्विट करत ‘प्रतीक्षा संपली’ असे ट्विट केले होते.

हे वॉर इथे थांबले नव्हते. तर त्यापुढे मुंबई इंडियन्सने IPL मध्ये जिंकलेल्या चषकांचा एक फोटो ट्विट केला. त्यांच्याकडे या स्पर्धेची तीन विजेतेपदं आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून तसे ट्विट केले होते आणि ‘प्रतीक्षा अजून संपलेली नाही’, असे कॅप्शन दिले होते.

याच चर्चेत CSKने उडी घेतली. त्यांनी एकाच फोटो धोनीचे ३ समान फोटो एडिट करून वापरले आणि ‘३ चेहरे’ असे कॅप्शनही दिले.

याशिवाय, KKRनेही मुंबईच्या त्या ट्विटला उत्तर दिले आहे.

दरम्यान, या ट्विटरवॉरची नेटकरी मजा घेत आहेत आणि आपली मजेशीर मतंही नोंदवत आहेत.