चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात शनिवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लढतीत अनुक्रमे महेंद्रसिंह धोनी आणि रविचंद्रन अश्विन यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

धोनी म्हणजे संयमाचा महामेरू. कठीण प्रसंगातही आपली शांतता भंग पावणार नाही, याची काळजी तो घेतो. याविरोधात अश्विनची वृत्ती आक्रमक. चौकडीपलीकडचे निर्णय घेण्यात तो वाकबगार आहे. त्यामुळे सामन्यातील रंगत वाढते. दोन्ही संघांच्या खात्यावर तीन विजयांची नोंद असून, ‘आयपीएल’ गुणतालिकेत आगेकूच करण्याची संधी या संघांना असेल.

गतविजेत्या चेन्नईने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या हंगामातील पहिला पराभव पत्करला. त्यामुळे सलग तीन विजयांची त्यांची मालिका खंडित झाली. परंतु घरच्या मैदानावर पुन्हा विजयपथावर परतण्याची संधी त्यांना असेल.

एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवरील याआधीचे दोन्ही सामने परस्परविरोधी ठरले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा संघ पहिल्याच सामन्यात ७० धावांत गारद झाला होता. मग दुसऱ्या लढतीत खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिल्यामुळे उत्तम धावसंख्या नोंदली गेली.

सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांचे बळ असलेल्या चेन्नईचे पंजाबविरुद्ध पारडे जड मानले जात आहे. पंजाबकडेही अश्विनसह मुजीब उर रेहमान, लेग-स्पिनर एम. अश्विन आणि जादुई गोलंदाज सी. व्ही. वरुण अशी फिरकीची अस्त्रे आहेत. चेन्नईच्या गोलंदाजांना स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची चिंता आहे. १ एप्रिलला झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. पंजाबकडे लोकेश राहुल, मयांक अगरवाल यांच्यासारखे दर्जेदार फलंदाजसुद्धा आहेत.

चेन्नईची भिस्त सांघिक कामगिरीवर आहे. सलामीवीर अंबाती रायुडू धावांसाठी झगडत आहे. त्यामुळे मुरली विजयला संधी मिळू शकते. ड्वेन ब्राव्होच्या उपलब्धतेबाबतही शंका आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज स्कॉट कुगेलिनला संघात स्थान मिळू शकते.

मुंबईच्या फलंदाजांनी जोरदार आक्रमण केल्यानंतर आता गोलंदाजांनी कामगिरी सुधारावी, अशी अपेक्षा धोनीची असेल. या लढतीत मोहित शर्मा किंवा शार्दुल ठाकूरऐवजी चेन्नई आणखी एका फिरकी गोलंदाजाला खेळवू शकते.

संघ

किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), सॅम करण, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मोझेस हेंड्रिक्स, हार्डस व्हिलजोएन, दर्शन नळकांडे, करुण नायर,सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार,  ख्रिस गेल, मुरुगन अश्विन,अँड्रय़ू टाय, लोकेश राहुल, अंकित राजपूत, मनदीप सिंग, सिमरन सिंग, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, डेव्हिड मिलर.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, स्कॉट कुगेलिन, एन. जगदीशन (यष्टिरक्षक.)

सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.