चेन्नई : वय हा फक्त एक आकडा असतो, हेच गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदाला गवसणी घालून सिद्ध केले होते. वयस्कर आणि अनुभवी खेळाडूंचा हाच चेन्नईचा संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सातव्या हंगामाला दिमाखदार प्रारंभ करण्यासाठी उत्सुक आहे. शनिवारी त्यांची सलामीची लढत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी होणार आहे.

चेन्नईचे एम. ए. चिदम्बरम स्टेडियम म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा बालेकिल्ला. महेंद्रसिंह धोनीच्या अफाट नेतृत्वक्षमतेशी मुकाबला करून विजयी प्रारंभ करण्याचे आव्हान विराटच्या बेंगळूरुसमोर असेल.

चेन्नई संघाची मदार ही प्रामुख्याने वयस्कर खेळाडूंवर आहे. ३७ वर्षीय धोनी आणि शेन वॉटसन, ३५ वर्षीय ड्वेन ब्राव्हो, ३४ वर्षीय फॅफ डय़ू प्लेसिस, ३३ वर्षीय अंबाती रायुडू आणि केदार जाधव, ३२ वर्षीय सुरेश रैना हे खेळाडू सामन्याला कलाटणी देण्यात वाकबदार आहेत. याशिवाय ३९ वर्षीय इम्रान ताहीर आणि ३८ वर्षीय हरभजन सिंग हे दोन अनुभवी फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. लेग-स्पिनर कर्ण शर्मा (३१) आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा (३०) हे भारतीय संघाबाहेर असलेले दोन खेळाडू त्यांच्या ताकदीत भर घालतात.

‘आयपीएल’मधील सर्वात सातत्यपूर्ण संघ अशी चेन्नईची ओळख आहे. प्रत्येक स्पर्धेत अव्वल चारपैकी त्यांचे स्थान असते. अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातील स्थान निश्चित करण्यासाठी कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील.

बेंगळूरुविरुद्ध चेन्नईचे पारडे जड मानले जात आहे. परंतु कोहली हा नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व करतो. लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलकडे चेन्नईच्या फलंदाजीची फळी भेदण्याची क्षमता आहे. याशिवाय एबी डी’व्हिलियर्स हा स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वेगवान गोलंदाज उमेश यादवला निवड समितीचे लक्ष वेधणारी गोलंदाजी करावी लागणार आहे.

संघ

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, एन. जगदीशन (यष्टीरक्षक)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.

१५ चेन्नईने बेंगळूरुविरुद्ध १५ सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर पाच सामने गमावले आहेत. २०१४मध्ये उभय संघांमधील एका सामन्याचा निकाल लागला नव्हता.

*  सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार गोल्ड, माँ मुव्हीज, जलशा मुव्हीज, स्टार प्रवाह, एशियानेट प्लस.