IPL 2019 मध्ये आज (शुक्रवारी) क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली आणि चेन्नई या दोन संघामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ मुंबईच्या संघाविरुद्ध १२ मे रोजी अंतिम सामना खेळणार आहे. मंगळवारी झालेल्या क्वालिफायर १ मध्ये विजय मिळवून मुंबईच्या संघाने अंतिम सामना गाठला. चेन्नईच्या संघाविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले होते. त्यामुळे ज्या संघाला अंतिम फेरी गाठायची असेल, त्या संघाने आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

चेन्नई विरूद्ध दिल्ली सामना म्हणजे अनुभवी खेळाडू विरूद्ध युवा खेळाडू… चेन्नईचा संघ या आधी अनेक वेळा अंतिम सामने खेळलेला संघ आहे. त्यांच्या संघाचे नेतृत्व अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे आहे. या संघात रवींद्र जाडेजा, मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहीर यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंना दडपणाच्या स्थितीत खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे चेन्नई संघाचे चाहते त्यांच्या खेळाडूंच्या मागे उभे आहेत.

या उलट दिल्लीचा संघ हा अत्यंत नव्या दमाचा आणि युवा खेळाडूंचा भरणा असलेला आहे. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखालील संघात भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जाणारे पृथ्वी शॉ, ऋषभ पंत हे खेळाडू आहेत. याशिवाय अनुभवाचा समतोल साधण्यासाठी सलामीवीर शिखर धवन, इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यासारखे खेळाडूही आहेत.

उत्साहाने परिपूर्ण असेलला दिल्लीचा संघ २०१२ सालानंतर प्रथमच प्ले ऑफ्स गटात पोहोचला आहे. याबाबत योगायोग म्हणजे २०१२ साली क्वालिफायर २ या सामन्यात दिल्लीच्या संघापुढे चेन्नईचेच आव्हान होते. पण त्या सामन्यात चेन्नईकडून दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना मुरली विजयच्या (११३) शतकाच्या जोरावर चेन्नईने २२२ धावा ठोकल्या होत्या. तर दिल्लीला प्रत्युत्तरात केवळ १३६ धावत करता आल्या होत्या. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी स्पर्धेच्या अगदी समान टप्प्यावर दिल्लीला चेन्नईकडून झालेल्या ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी आहे.

याचबरोबर, आजच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत या दोघांच्या कामगिरीवर सर्व क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईने दोनही वेळा दिल्लीवर विजय मिळवला होता, त्यामुळे या हंगामातील पराभवाचा वचपा काढण्याचीही संधी दिल्लीकडे आहे.