IPL 2019 मध्ये शनिवारी चेन्नईच्या मैदानावर पंजाब विरुद्ध चेन्नई हा सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला १६० धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नई सुपर किंग्जने घरच्या मैदानावर सामना खेळत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी चांगली भागीदारी करुन दिली. मात्र रविचंद्रन आश्विनने शेन वॉटसनला माघारी धाडत चेन्नईला पहिला धक्का दिला.

वॉटसन- डू प्लेसिस जोडीने अर्धशतकी सलामी दिली. पण ५६ या धावसंख्येवर चेन्नईने वॉटसनला गमावले. कर्णधार रवी अश्विनने त्याला सातव्या षटकात माघारी धाडले. त्याने २४ चेंडूत २६ धावा केल्या. पण तो ज्यावेळी बाद झाला, त्याच्या काही मिनिटे आधीच भारतीय समालोचक आकाश चोप्रा याने ‘विकेट टाइम’ असे ट्विट केले होते. आकाश चोप्रा याने ट्विट दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी केले आणि पुढील पाचच मिनिटात वॉटसन बाद झाला.

या घटनेनंतर अनेकांनी आकाश चोप्राने व्यक्त केलेला अंदाजाबद्दल त्याची स्तुती केली.

दरम्यान, वॉटसन बाद झाल्यावर पंजाबच्या सर्व गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश लावला. डु प्लेसिसने अर्धशतकी खेळी केली. तो ५४ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ सुरेश रैनादेखील आश्विनच्या फिरकीचा शिकार झाला. त्याने १७ धाव केल्या. अखेर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांनी शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करत संघाला १५० चा टप्पा गाठून दिला. या दोघांनी शेवटच्या ३ षटकात तब्बल ४४ धावा चोपल्या. धोनीने २३ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार लगावत ३७ धावा केल्या, तर रायडूने १५ चेंडूत २१ धावा केल्या.