News Flash

IPL 2019 : पराभवापाठोपाठ अजिंक्य रहाणेला आणखी एक धक्का

अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर केली ८ धावांनी मात

रविवारी झालेल्या IPL च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आपली विजयी परंपरा कायम राखली. घरच्या मैदानावर खेळत असताना अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर ८ धावांनी मात केली. अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना ब्राव्होने राजस्थानच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आणि हंगामातील सलग तिसरा विजय संपादन केला. या सामन्यात राजस्थानचा संघ पराभूत तर झालाच, पण त्याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेसाठीही हा सामना वाईट ठरला. या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड IPL व्यवस्थापनाकडून करण्यात आला.

चेन्नईविरोधात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने केलेल्या गोलंदाजीच्या वेळी षटकांची गती न राखल्यामुळे अजिंक्य रहाणेवर ही कारवाई करण्यात आली आहे. IPL च्या आचारसंहितेच्या नियमावलीत षटकांच्या निर्धारित वेळेबाबत असलेला नियम यंदाच्या हंगामात राजस्थानकडून प्रथमच मोडला गेल्यामुळे त्याच्यावर १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे, असे IPL कडून सांगण्यात आले आहे. मुंबईला पंजाबविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यालाही त्याच कारणासाठी १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला होता.

दरम्यान, 176 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली होती. सलामीचे ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. मात्र मधल्या फळीत त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यानंतर आर्चर-स्टोक्स जोडीने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. मात्र अखेरच्या षटकात स्टोक्स माघारी परतल्याने राजस्थानच्या आशेवर पाणी फिरलं. ब्राव्होने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या संघाची विजयी परंपरा कायम राखली.

त्याआधी, कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर खेळत असताना आश्वासक धावसंख्या उभी केली. चांगली सुरुवात झालेली नसतानाही, धोनीने आधी सुरेश रैना आणि नंतर ब्राव्होच्या मदतीने संघाला 150 धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. 20 षटकात चेन्नईचा संघ 175 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

अंबाती रायुडू, शेन वॉटसन आणि केदार जाधव हे 3 फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या या कामगिरीमुळे चेन्नईची अवस्था काही क्षणांसाठी 27/3 अशी झाली होती. यानंतर सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी जोडीने संघाचा डाव सावरला.

या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे चेन्नईने आश्वासक धावसंख्या गाठली. जयदेव उनाडकटने रैनाचा त्रिफळा उडवत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. यानंतर रैनाने ब्राव्होच्या मदतीने संघाची बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. धोनीने 46 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याला अखेरच्या षटकात ब्राव्होनेही चांगली साथ दिली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 2 बळी घेतले. त्याला बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी यांनी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 4:36 pm

Web Title: ipl 2019 csk vs rr rajasthan captain ajinkya rahane fined 12 lakh rs for slow over rate
टॅग : IPL 2019
Next Stories
1 मैदानातून कॉमेंट्री, टॉसऐवजी ट्विटर पोल; ICC चे नवीन नियम खरे की एप्रिल फूल??
2 रबाडाच्या यॉर्करपुढे पंजाबच्या फलंदाजांचा कस लागणार?
3 रोनाल्डोच्या अनुपस्थितीत कीनने युव्हेंटसला तारले
Just Now!
X