सलामीवीर शेन वॉटसनचं आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर, चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सनराईजर्स हैदराबादवर ६ गडी राखून मात केली आहे. वॉटसनने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ९६ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने वॉटसनला यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. अवघ्या ४ धावांनी वॉटसनचं शतक हुकलं. या विजयासह चेन्नईने पुन्हा एकदा आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या १६ गुण जमा आहेत, त्यामुळे प्ले-ऑफच्या फेरीत दाखल होण्यासाठी चेन्नईचा संघ अवघी काही पावलं दूर आहे.

दरम्यान, हैदराबादने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अतिशय खराब झाली होती. फाफ डु प्लेसिस स्वस्तात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर सुरेश रैना आणि शेन वॉटसन जोडीने चेन्नईचा डाव सावरला. राशिद खानने सुरेश रैनाचा अडसर दूर करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. मात्र वॉटसनवर अंकुश लावणं हैदराबादच्या गोलंदाजांना जमलं नाही. वॉटसनने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. शतकासाठी अवघ्या ४ धावा असताना तो भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा केदार जाधव- अंबाती रायुडू जोडीने पूर्ण करत आणल्या होत्या. मात्र अखेरच्या षटकात विजयासाठी अवघी एक धाव हवी असताना अंबाती रायुडू माघारी परतला. मात्र चेन्नईने अखेरीस आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादकडून राशिद खान, संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १-१ बळी घेतला. चेन्नईचा एक फलंदाज धावबाद झाला.

त्याआधी, मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नरने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सनराईजर्स हैदराबाद संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादने चेन्नईच्या गोलंदाजांचा व्यवस्थित समाचार घेतला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने ५७ तर मनिष पांडेने नाबाद ८३ धावा केल्या. चेन्नईकडून हरभजन सिंहने २ तर दिपक चहरने १ बळी घेतला. याव्यतिरीक्त एकाही चेन्नईच्या गोलंदाजाला यश मिळालं नाही.

हैदराबादचा जॉनी बेअरस्टो आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर धोनीने बेअरस्टोचा झेल घेतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत, संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. डेव्हि़ड वॉर्नर माघारी परतल्यानंतर, विजय शंकरने मनिष पांडेला साथ दिली. अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना शंकरही माघारी परतला. दिपक चहरने त्याचा बळी घेतला. अखेरीस, मनिष पांडेने युसूफ पठाणच्या मदतीने संघाला १७५ धावांचा टप्पा गाठून दिला.

Live Blog

23:37 (IST)23 Apr 2019
अखेरीस चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात विजयी, हैदराबादवर ६ गडी राखून केली मात

८ विजयांसह चेन्नईचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल

23:36 (IST)23 Apr 2019
अखेरच्या षटकात अंबाती रायुडू माघारी

विजयासाठी १ धाव शिल्लक असताना संदीप शर्माने घेतला बळी

23:36 (IST)23 Apr 2019
शतकासाठी ४ धावा असताना वॉटसन माघारी

भुवनेश्वर कुमारने घेतला बळी

22:51 (IST)23 Apr 2019
शेन वॉटसनचं अर्धशतक

चेन्नईची झुंज सुरुच

22:46 (IST)23 Apr 2019
चेन्नईची जमलेली जोडी फुटली, रैना माघारी

राशिद खानच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या नादात रैना यष्टीचीत

22:45 (IST)23 Apr 2019
शेन वॉटसन - सुरेश रैना जोडीची भक्कम भागीदारी

चेन्नईचा डाव सावरला, धावसंख्या गाठण्याकडे चेन्नईची वाटचाल

22:08 (IST)23 Apr 2019
हैदराबादच्या गोलंदाजांची आक्रमक सुरुवात, चेन्नईच्या सलामीवीरांवर अंकुश

चोरटी धाव घेताना फाफ डु प्लेसिस माघारी, दिपक हुडाच्या अचूक फेकीवर डु प्लेसिस बाद. चेन्नईला पहिला धक्का

21:36 (IST)23 Apr 2019
हैदराबादची १७५ धावांपर्यंत मजल

चेन्नईला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान

मनिष पांडेची नाबाद ८३ धावांची खेळी, चेन्नईकडून हरभजनला दोन तर दिपक चहरला एक बळी

21:29 (IST)23 Apr 2019
हैदराबादला तिसरा धक्का, विजय शंकर माघारी

दिपक चहरने घेतला बळी

20:56 (IST)23 Apr 2019
लागोपाठ डेव्हिड वॉर्नरचंही अर्धशतक

दोघांच्या भागीदारीमुळे हैदराबादचा डाव सावरला, चेन्नईचे गोलंदाज हतबल

हरभजनच्या गोलंदाजीवर वॉर्नर माघारी, धोनीने केलं यष्टीचीत

20:54 (IST)23 Apr 2019
मनिष पांडेचं अर्धशतक, संघाचा डाव सावरला

चेन्नईच्या गोलंदाजांचा मनिष पांडेकडून समाचार

20:10 (IST)23 Apr 2019
हैदराबादची खराब सुरुवात, बेअरस्टो माघारी

हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीने घेतला झेल

19:51 (IST)23 Apr 2019
चेन्नईने नाणेफेक जिंकली

प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय