रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सध्या IPL मध्ये तळाशी आहे. प्रत्येक सामन्यात त्यांच्या पदरी हार पडली आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात त्यांना एकही गुण कमावता आलेला नाही. इतकेच नव्हे तर फलंदाजीत १५० ते २०० धावा करूनदेखील काही वेळा त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. त्यामुळे RCB ची गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. या दरम्यान RCB च्या चाहत्यांना आशेचा किरण दिसला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा लवकरच RCB ताफ्यात दाखल होत असून नॅथन कुल्टर नाईल याच्या जागी डेल स्टेनला ताफ्यात दाखल करण्यात येत असल्याचे एका संकेतस्थळाने म्हंटले आहे. स्टेन गुजरात लायन्स संघाकडून आपला शेवटचा IPL सामना २०१६ मध्ये खेळला होता. त्याआधी डेल स्टेनने RCB कडून एकूण २८ सामने खेळले आहेत.

RCB च्या संघात डेल स्टेन परतण्याची चर्चा गेले काही दिवसांपासून रंगली होती. तशातच डेल स्टेन याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये डेल स्टेनने त्याला मिळालेल्या भारताच्या व्हिसाचा फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्येच ‘एक छोटंसं सरप्राईज घेऊन येतोय’, असंही त्याने लिहिलं आहे.

दरम्यान, RCB ने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यापैकी पहिल्या सामन्यात RCB ने केवळ ७० धावा केल्या आणि चेन्नईने तो सामना सहज जिंकला. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून त्यांना शेवटच्या चेंडूवर हार पत्करावी लागली. तिसऱ्या सामन्यात त्यांना हैदराबादकडून तब्बल ११८ धावांनी पराभूत व्हावे लागले, तर चौथा सामना राजस्थानने १ चेंडू राखून जिंकला. पाठोपाठ कोलकाताच्या संघानेही RCB ला शेवटच्या षटकात नमवले. २०० हुन अधिक धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या रसलने तुफानी खेळी केली आणि RCB च्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. दिल्लीच्या सामन्यातही त्यांची हाराकिरी सुरूच राहिली. त्यामुळे ते सध्या शून्य गुणांसह गुणतालिकेत अंतिम आहेत.

अशा परिस्थितीमध्ये डेल स्टेनसारखा खेळाडू जर RCB च्या ताफ्यात दाखल झाला, तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.