डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर, सनराईजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी मात केली. हैदराबादने ९ गडी राखून सामना जिंकत, प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं आहे. कोलकात्याने विजयासाठी दिलेलं १६० धावांचं आव्हान हैदराबादने सहज पूर्ण केलं. वॉर्नर-बेअरस्टो जोडीने पहिल्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं साजरी केली. डेव्हिड वॉर्नर ६७ धावांवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. बेअरस्टोने नाबाद ८० धावांची खेळी केली.

कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. आयपीएलच्या एका हंगामात सलामीच्या जोडीकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता वॉर्नर-बेअरस्टो जोडीच्या नावावर जमा झाला आहे. या दोन्ही फलंदाजांच्या नावावर बाराव्या हंगामात ७३३ धावा जमा आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, याआधीच्या सर्वोत्तम ३ भागीदाऱ्या वॉर्नर आणि शिखर धवन जोडीच्या नावावर आहेत.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधीक धावा करणाऱ्या सलामीच्या जोड्या –

जॉनी बेअरस्टो – डेव्हिड वॉर्नर (२०१९) – ७३३* धावा

डेव्हिड वॉर्नर – शिखर धवन (२०१६) – ७३१ धावा

डेव्हिड वॉर्नर – शिखर धवन (२०१७) – ६५५ धावा

डेव्हिड वॉर्नर – शिखर धवन (२०१५) – ६४६ धावा

दरम्यान जॉनी बेअरस्टोचा या हंगामातला हा अखेरचा सामना होता. मात्र या जोडीने बाराव्या हंगामातली केलेली फलंदाजी पाहता त्यांचा हा विक्रम कोणी मो़डेल याची शक्यता कमीच आहे.