04 July 2020

News Flash

IPL 2019 : मुंबईकर पृथ्वी शॉ चा ‘गब्बर’ अंदाज पाहिलात का?

पृथ्वी शॉ ला मोक्याच्या क्षणी सूर गवसल्यामुळे चाहत्यांच्या दिल्लीकडून अपेक्षा उंचावल्या आहेत

IPL 2019 : दिल्लीने हैदराबाद संघाचा बाद फेरीत पराभव करून प्ले ऑफ्स गटातील आव्हान काय राखले. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने झळकावलेलं अर्धशतक आणि त्याला मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिलेली साथ या जोरावर दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. आज त्यांचा चेन्नईविरुद्ध सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांमधला विजेता अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध खेळणार आहे.

बाद फेरीच्या सामन्यात पृथ्वी शॉ ने दमदार कामगिरी करत अर्धशतक ठोकले. त्याच्या या खेळीचे खास कौतुक झाले. यंदाच्या हंगामात फारशी चांगली कामगिरी न करता आलेल्या पृथ्वी शॉ ला मोक्याच्या क्षणी सूर गवसल्यामुळे त्याचा दिल्लीला उपयोग झाला. या सामन्यानंतर पृथ्वी शॉ चा एक खास अंदाज साऱ्यांना पाहायला मिळाला. ‘गब्बर’ क्रिकेटपटू शिखर धवनने पृथ्वी शॉ याची एक छोटीशी मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात काय प्लॅन असेल हे सांगितले. त्याचबरोबर झेल टिपल्यावर ज्या प्रकारे धवन सेलिब्रेशन करतो, तसेच सेलिब्रेशन पृथ्वी शॉ यानेही करून दाखवले.

दरम्यान, १६३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने धुवाँधार फटकेबाजी करत दिल्लीचं पारडं सामन्यात पुन्हा एकदा जड केलं. अखेरच्या षटकात अमित मिश्रा माघारी परतल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. मात्र अखेरीस किमो पॉलने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत दिल्लीने हैदराबादच्या आशांवर पाणी फिरवलं.

त्याआधी, दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे हैदराबादला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून सलामीवीर मार्टीन गप्टील, मनिष पांडे, केन विल्यमसन, विजय शंकर यांनी चांगली झुंज दिली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. अखेरच्या षटकांमध्ये विजय शंकर आणि मोहम्मद नबी यांनी फटकेबाजी करत हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईविरुद्ध रंगणार आहे. या दोन्ही संघांमधला विजेता अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध खेळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2019 2:50 pm

Web Title: ipl 2019 dc batsman prithvi shaw mimics shikhar dhawan gabbar signature step
टॅग IPL 2019
Next Stories
1 ऋषभ पंत नवीन पिढीचा विरेंद्र सेहवाग – संजय मांजरेकर
2 इंग्लंडच्या ‘बार्मी आर्मी’कडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची खिल्ली
3 IPL 2019 : ७ वर्षानंतर दिल्लीला पराभवाचा वचपा काढण्याची संधी
Just Now!
X