विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स संघाने हैदराबादवर मात करत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश मिळवला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने २ गडी राखून बाजी मारत हैदराबादच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा दिल्लीच्या किमो पॉलने खलिल अहमदच्या गोलंदाजीवर चौकार लगावत पूर्ण केल्या. याचसोबत एक अनोखा योगायोग विशाखापट्टणमच्या मैदानावर घडून आला.

२०१६ साली १९ वर्षाखालील संघाच्या विश्वचषक स्पर्धेत विंडीजच्या किमो पॉलने खलिल अहमदच्या गोलंदाजीवर चौकार लगावत विजयी धाव काढली होती. आज तब्बल ३ वर्षांनी किमो पॉलनेच खलिलच्या गोलंदाजीवर चौकार लगावत दिल्लीच्या संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, १६३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. अखेरीस दिपक हुडाने धवनला माघारी धाडत दिल्लीची जमलेली जोडी फोडली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही खलिल अहमदच्या गोलंदाजीवर तात्काळ माघारी परतला. दरम्यान पृथ्वी शॉने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. खलिल अहमदने पृथ्वीला माघारी धाडत दिल्लीला आणखी एक धक्का दिला.

यानंतर राशिद खानने एकाच षटकात दोन बळी घेत दिल्लीला बॅकफूटला ढकललं. मात्र यानंतर ऋषभ पंतने धुवाँधार फटकेबाजी करत दिल्लीचं पारडं सामन्यात पुन्हा एकदा जड केलं. अखेरच्या षटकात अमित मिश्रा माघारी परतल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. मात्र अखेरीस किमो पॉलने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत दिल्लीने हैदराबादच्या आशांवर पाणी फिरवलं. ऋषभ पंतनेही धावांची खेळी केली. हैदराबादकडून खलिल अहमद, राशिद खानने आणि भुवनेश्वर कुमारने २-२ बळी घेतले. त्यांना दिपक हुडाने १ बळी घेत चांगली साथ दिली.