16 October 2019

News Flash

IPL 2019 : दिल्लीपुढे हैदराबादची शरणागती; १० धावांत गमावले ७ गडी

सलामीवीर वॉर्नर आणि बेअरस्टो वगळता कोणीही गाठली नाही दोन अंकी धावसंख्या

IPL 2019 SRH vs DC Updates : हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने यजमानांना ३९ धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला. कॉलिन मुनरो (४०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (४५) यांच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्लीने हैदराबादला सामना जिंकण्यासाठी १५६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि किमो पॉल या वेगवान माऱ्यापुढे हैदराबादचा संघ ११६ धावांत गारद झाला. रबाडाने सर्वाधिक ४ बळी टिपत ‘पर्पल कॅप’ मिळवली.

१५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करून दिली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी मिळून आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर बेअरस्टो झेलबाद झाला आणि हैदराबादला पहिला झटका बसला. त्याने ४१ धावा केल्या. दीर्घ विश्रांतीनंतर संघात आलेला कर्णधार विल्यमसनदेखील लवकर माघारी परतला. त्याने केवळ ३ धावा केल्या. नवख्या रिकी भुईलाही चांगली कामगिरी करता आली नाही. १२ चेंडूत ७ धावा करून तो बाद झाला.

पण वॉर्नरने एक बाजू लावून धरली होती. ४ षटकात ५२ धावांची गरज असताना हैदराबादची धावसंख्या ३ बाद १०६ होती. पण त्यानंतर डेव्हिड वॉर्नर अर्धशतक करून माघारी गेला. फटकेबाजी गरजेची असल्याने त्या प्रयत्नात तो अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. वॉर्नरनंतरच्या चेंडूवर विजय शंकरही १ धाव काढून बाद झाला. तो बाद झाल्यावर पत्त्याचा बंगला कोसळावा तसा हैदराबादचा डाव कोसळला आणि हैदराबादचा डाव ११६ धावांमध्ये आटोपला. सलामीवीर वॉर्नर आणि बेअरस्टो वगळता कोणीही दोन अंकी धावसंख्या गाठली नाही.

त्याआधी नाणेफेक जिंकून कर्णधार केन विल्यमसनने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय त्याच्या सहकाऱ्यांनी सार्थ ठरवला. हैदराबादकडून खलिल अहमदने सर्वाधिक ३ बळी घेतले. दिल्लीच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ (४) खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतला. यानंतर शिखर धवनही (७) मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेल देऊन बाद झाला. यानंतर कॉलिन मुनरो (४०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (४५) जोडीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. मात्र कॉलिन मुनरो माघारी परतल्यानंतर दिल्लीचा डाव परत कोलमडला. ऋषभ पंतने काही काळ फटकेबाजी केली, त्या जोरावर दिल्लीला १५५ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे महत्वाच्या षटकांमध्ये दिल्लीचा संघ धावा जमवू शकला नाही. अखेरीस शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत दिल्लीने १५५ धावांपर्यंत मजल मारली.

First Published on April 14, 2019 11:57 pm

Web Title: ipl 2019 dc pacer dismantle srh batting lose 7 wickets in 10 runs
टॅग IPL 2019