आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्ले-ऑफच्या गटात दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. चेन्नईनंतर प्ले-ऑफच्या गटात पोहचलेला दिल्ली या हंगामातला दुसरा संघ आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने बंगळुरुवर १६ धावांनी मात केली. बंगळुरुच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना चांगली टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी बाजी मारत दिल्लीने आपलं प्ले-ऑफमधलं स्थान पक्क केलं आहे. बंगळुरुचा संघ १७१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

विराट कोहली-पार्थिव पटेल जोडीने आक्रमक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवत दिल्लीवर दबाव आणला, मात्र रबाडाने पटेलला माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, शिवम दुबे, हेन्रिच क्लासेन हे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकात गुरकिरत मान आणि मार्कस स्टॉयनीस जोडीने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. दिल्लीकडून अमित मिश्रा आणि कगिसो रबाडाने २ तर इशांत शर्मा, अक्षर पटेल, शेरफन रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, शिखर धवन-कर्णधार श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि तळातल्या फळीत शेरफन रुदरफोर्ड आणि अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, दिल्ली कॅपिटल्स संघाने १८७ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने चांगली सुरुवात केली. मात्र मधल्या षटकांत बंगळुरुने पुनरागमन करत दिल्लीच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र अखेरच्या षटकात रुरदफोर्डने फटकेबाजी करत दिल्लीला आव्हानात्मक लक्ष्य गाठून दिलं.

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ आजच्या सामन्यातही फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. उमेश यादवने त्याला माघारी धाडलं. मात्र यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अर्धशतक झळकावल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर तात्काळ माघारी परतले.

यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांवर अंकुशष लावत बंगळुरुने सामन्यात पुनरागमन केलं होतं. मात्र अखेरच्या षटकांत रुदरफोर्ड आणि पटेलने फटकेबाजी करत संघाला १८७ धावांचा पल्ला गाठून दिला. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने २, तर उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

19:36 (IST)28 Apr 2019
अखेर दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब

१६ धावांनी बंगळुरुवर केली मात, प्ले-ऑफच्या गटात मिळवलं स्थान

19:29 (IST)28 Apr 2019
बंगळुरुला सातवा धक्का, वॉशिंग्टन सुंदर माघारी

कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने घेतला झेल

19:27 (IST)28 Apr 2019
गुरकिरत मान माघारी, दिल्लीला सहावा धक्का

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने घेतला बळी

गुरकिरतची एकाकी झुंज

18:57 (IST)28 Apr 2019
शिवम दुबे माघारी, बंगळुरुला पाचवा धक्का

अमित मिश्राने घेतला बळी

18:53 (IST)28 Apr 2019
बंगळुरुला चौथा धक्का, हेन्रिच क्लासन माघारी

अमित मिश्रांच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पंतने घेतला झेल

18:50 (IST)28 Apr 2019
डिव्हीलियर्स माघारी, बंगळुरुला तिसरा धक्का

रुदरफोर्डच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर अक्षर पटेलने घेतला झेल

18:32 (IST)28 Apr 2019
पाठोपाठ विराट कोहलीही माघारी, बंगळुरुला दुसरा धक्का

अक्षर पटेलने घेतला बळी, कोहलीच्या १७ चेंडूत २३ धावा

18:26 (IST)28 Apr 2019
बंगळुरुला पहिला धक्का, पार्थिव पटेल माघारी

कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर पटेल झेलबाद

मात्र विराट कोहलीच्या साथीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

17:42 (IST)28 Apr 2019
रुदरफोर्ड-अक्षर पटेलची अखेरच्या षटकांत फटकेबाजी

दिल्लीची १८७ धावांपर्यंत मजल, बंगळुरुला विजयासाठी १८८ धावांचं आव्हान

17:25 (IST)28 Apr 2019
कॉलिन इन्ग्राम माघारी

दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला

17:19 (IST)28 Apr 2019
श्रेयस अय्यर माघारी, दिल्लीला चौथा धक्का

वॉशिंग्टन सुंदरने घेतला बळी

17:15 (IST)28 Apr 2019
दिल्लीला तिसरा धक्का, ऋषभ पंत माघारी

दरम्यान दुसऱ्या बाजूने कर्णधार श्रेयस अय्यरचंही अर्धशतक

17:01 (IST)28 Apr 2019
काही क्षणांमध्ये शिखर धवन माघारी, दिल्लीला दुसरा धक्का

युजवेंद्र चहलने घेतला बळी

17:00 (IST)28 Apr 2019
शिखर धवनचं अर्धशतक

दिल्लीने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

16:17 (IST)28 Apr 2019
दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ माघारी

उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पार्थिव पटेलने घेतला झेल

15:40 (IST)28 Apr 2019
दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

दिल्लीच्या संघाला आजच्या सामन्यात विजय महत्वाचा