सलामीवीर क्विंटन डी-कॉकने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात १६१ धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी-कॉक जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

डी-कॉक – यादव जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. यासोबत आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर सर्वात जास्त भागीदारी रचण्याचा विक्रम डी-कॉक – यादव जोडीने आपल्या नावावर केला आहे. मुंबईच्या या फलंदाजांनी महेंद्रसिंह धोनी – अंबाती रायुडू जोडीचा ९५ धावांचा विक्रम मोडीत काढला.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात जयपूरच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी –

  • क्विंटन डी-कॉक – सूर्यकुमार यादव : ९७ धावांची भागीदारी
  • अंबाती रायुडू – महेंद्रसिंह धोनी : ९५ धावांची भागीदारी
  • ख्रिस लिन – सुनिल नरीन : ९१ धावांची भागीदारी
  • ख्रिस गेल – सरफराज खान : ८४ धावांची भागीदारी
  • क्विंटन डी-कॉक – सूर्यकुमार यादव : ८४* धावांची भागीदारी

दरम्यान, राजस्थानच्या संघाने ८ पैकी केवळ २ सामने जिंकल्यामुळे संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला. अजिंक्य रहाणेऐवजी संघ व्यवस्थापनाने स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदाची जबाबदारी दिली.