चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तब्बल २० चेंडू निर्धाव टाकत आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
यापूर्वी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी १८ चेंडू निर्धाव टाकले होते. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चहरने ख्रिस लिन, नितिश राणा, रॉबिन उथप्पा या तिघांना झटपट बाद करीत दमदार कामगिरी बजावली. त्याशिवाय नंतरच्या टप्प्यात समोर आंद्रे रसेलसारखा तुफानी फलंदाज असतानाही चहरने तब्बल पाच चेंडू निर्धाव टाकले. त्यामुळे चहर हा आता सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे.
अधिक चांगली खेळपट्टी हवी
कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबरच अव्वल जलदगती गोलंदाज दीपक चहर यानेही चेन्नईला अधिक चांगली खेळपट्टी अपेक्षित असल्याचे सांगितले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध तीन बळी घेत सामनावीर ठरलेल्या चहरने चेपॉकची खेळपट्टी चांगली मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘‘मी चांगली गोलंदाजी केल्याचा आनंद नक्कीच आहे, मात्र अशी खेळपट्टी कुणालाच नको असते. चेन्नईतील हवामान खूप गरम असून क्युरेटर त्यांच्यापरीने खेळपट्टी चांगली करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात,’’ असेही चहरने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 12:46 am