घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघावर ४० धावांनी मात करत मुंबई इंडियन्स, बाराव्य हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या १६९ धावांचं आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला.

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने दिल्लीच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र राहुल चहरने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. धवन आणि पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या आक्रमणाची धार धारदार करत दिल्लीचा बॅकफूटला ढकललं. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, कॉलिन मुनरो हे फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीत.

अखेरच्या फळीत अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिस यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दिल्लीसमोरचं आव्हान हे अशक्यप्राय अवस्थेत गेलं होतं. अखेरीस मुंबईने धावांनी विजय मिळवत गुणतालिकेतलं दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. मुंबईकडून राहुल चहरने ३, जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. त्यांना लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सला १६८ धावांवर रोखण्यात यश मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय काहीसा उलटला. चांगली सुरुवात झाल्यानंतरही, मधल्या फळीत भागीदारी न होऊ शकल्यामुळे मुंबईला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत मुंबईच्या धावगतीला वेसण घातली.

रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. मुंबई मोठी धावसंख्या गाठेल असं वाटत असतानाच अमित मिश्राने रोहितचा त्रिफळा उडवला. या खेळीदरम्यान रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला. रोहित माघारी परतल्यानंतर बेन कटिंगही लवकर माघारी परतला.

यानंतर फलंदाजांनी मैदानात तळ ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी रचण्यात त्यांना अपयश आलं. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या जोडीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत मुंबईला धावांचं आव्हान गाठून दिलं. दिल्लीकडून कगिसो रबाडाने २ तर अक्षर पटेल आणि अमित मिश्राने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

23:28 (IST)18 Apr 2019
मुंबईची दिल्लीवर ४० धावांनी मात

गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप

23:25 (IST)18 Apr 2019
अखेरच्या षटकात रबाडा माघारी

दिल्लीचा नववा गडी माघारी, हार्दिक पांड्याने घेतला बळी

23:14 (IST)18 Apr 2019
लागोपाठच्या चेंडूवर अक्षर पटेल माघारी

बुमराहने घेतला पटेलचा बळी

23:14 (IST)18 Apr 2019
किमो पॉल धावचीत, दिल्लीला सातवा धक्का

चोरटी धाव घेताना किमो पॉल बुमराहच्या अचूक फेकीवर माघारी

23:11 (IST)18 Apr 2019
ख्रिस मॉरिस माघारी

दिल्लीचा सहावा गडी तंबूत परतला, लसिथ मलिंगाला मिळाला बळी

22:53 (IST)18 Apr 2019
ऋषभ पंत त्रिफळाचीत होऊन माघारी

बुमराहने घेतला बळी, दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला

22:41 (IST)18 Apr 2019
कर्णधार श्रेयस अय्यर चहरच्या फिरकीचा बळी, दिल्लीला चौथा धक्का

राहुल चहरने उडवला श्रेयसचा त्रिफळा, चहरचा सामन्यातला तिसरा बळी

22:37 (IST)18 Apr 2019
दिल्लीला तिसरा धक्का, कॉलिन मुनरो त्रिफळाचीत

कृणाल पांड्याने उडवला मुनरोचा त्रिफळा

22:32 (IST)18 Apr 2019
दिल्लीला दुसरा धक्का, पृथ्वी शॉ माघारी

राहुल चहरच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने घेतला झेल

22:24 (IST)18 Apr 2019
दिल्लीला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

अर्धशतकी भागीदारीनंतर राहुल चहरने उडवला धवनचा त्रिफळा

21:41 (IST)18 Apr 2019
कृणाल-हार्दिकची अखेरच्या षटकात फटकेबाजी, मुंबईची १६८ धावांपर्यंत मजल

दिल्लीला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान

21:37 (IST)18 Apr 2019
अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या माघारी

कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पंतकडे झेल देत पांड्या बाद

21:21 (IST)18 Apr 2019
मुंबईला चौथा धक्का, सूर्यकुमार यादव माघारी

कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ऋषभ पंतने घेतला झेल

20:53 (IST)18 Apr 2019
मुंबईला तिसरा धक्का, डी-कॉक माघारी

सूर्यकुमार यादव - डी-कॉक यांच्यातील सावळ्या गोंधळाचा मुंबईला फटका. 

चोरटी धाव घेताना डी-कॉक माघारी

20:42 (IST)18 Apr 2019
तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला बेन कटिंग अपयशी

अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कटिंग पायचीत होऊन माघारी

20:35 (IST)18 Apr 2019
अमित मिश्राने फोडली मुंबईची जोडी, रोहित शर्मा माघारी

मुंबईला पहिला धक्का

20:34 (IST)18 Apr 2019
रोहित शर्मा - क्विंटन डी-कॉक जोडीची आक्रमक सुरुवात

पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी

19:45 (IST)18 Apr 2019
मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

मुंबईच्या संघात ३ महत्वपूर्ण बदल