नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या बाद फेरीतील स्थान आधीच निश्चित केले आहे. आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला नमवून गुणतालिकेत दुसरे स्थान प्राप्त करण्याचे दिल्लीचे लक्ष्य आहे. मात्र या सामन्यात दिल्लीला वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाची उणीव तीव्रतेने भासणार आहे.

दुखापतीमुळे रबाडाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या बुधवारी झालेल्या सामन्यात प्रथमच मुकावे लागले होते. हा सामना दिल्लीने ८० धावांनी गमावला. मात्र आता विजेतेपदाकडे वाटचाल करणाऱ्या दिल्लीला रबाडाशिवायच योजना आखावी लागणार आहे.

रबाडाशिवाय दिल्लीच्या गोलंदाजीचा मारा दुबळा झाला आहे. यात चेन्नईविरुद्धच्या लढतीमधील फलंदाजांच्या हाराकिरीने कर्णधार श्रेयस अय्यरच्या चिंतेत भर घातली आहे. चेन्नईच्या ४ बाद १७९ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा डाव फक्त ९९ धावांत आटोपला होता. अय्यरने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले होते. आता फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील अखेरच्या सामन्यात पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत आणि कॉलिन इन्ग्राम यांना खेळ उंचवावा लागणार आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतल्यामुळे अजिंक्य रहाणेकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अ‍ॅश्टॉन टर्नरला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्मिथऐवजी संधी मिळू शकते. परंतु स्मिथ, जोस बटलर आणि बेन स्टोक्स संघाबाहेर गेल्यामुळे राजस्थानची स्थिती आणखी बिकट झाली आहे. आता रहाणे, संजू सॅमसन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात लेग-स्पिनर श्रेयस गोपाळने हॅट्ट्रिक साकारली होती. जयपूरला झालेल्या उभय संघांमधील याआधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सहा गडी राखून विजय मिळवला होता.

’ सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १