दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात भारतात इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) क्रिकेटमय मनोरंजनाचा हंगाम बहरतो. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे यंदा मार्च उत्तरार्धातच आयपीएलच्या १२व्या पर्वाला सुरुवात होत आहे. त्यातच आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने भारतासह विदेशातील अनेक खेळाडूंनीदेखील या स्पर्धेसाठी सावध पवित्रा अवलंबला आहे. त्या पाश्र्वभूमीवर आठही संघांच्या ताकदीचा घेतलेला हा आढावा-

चेन्नई सुपर किंग्ज

विजेतेपद : २०१०, २०११, २०१८

मुख्य आकर्षण : महेंद्रसिंह धोनी

‘आयपीएल’मधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून धोनीच्या चेन्नईची ख्याती आहे. २०१६ आणि १७ या दोन वर्षांच्या कालावधीत बंदीची शिक्षा झालेल्या चेन्नईने गतवर्षी बहुतांश तिशी ओलांडलेल्या खेळाडूंसह विजेतेपदाला गवसणी घातली. सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन यांसारख्या मातब्बरांचा संघात समावेश असला तरी यंदा धोनीकडे सर्व चेन्नईवासीयांचे प्रामुख्याने लक्ष राहील. धोनीची ही अखेरची ‘आयपीएल’ असू शकते. गोलंदाजीत इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग चेन्नईकडे आहेत.

मुंबई इंडियन्स

विजेतेपद : २०१३, २०१५, २०१७

मुख्य आकर्षण : युवराज सिंग

चेन्नईनंतर ‘आयपीएल’मधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी आणि नेहमी प्रकाशझोतातील संघ म्हणून मुंबई इंडियन्स ओळखला जातो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली  मुंबईने तीन वेळा जेतेपद मिळवले आहे. जसप्रीत बुमरा आणि अनुभवी युवराज सिंगच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष आहे. मात्र संघाला मधल्या फळीत अनुभवी फलंदाजांची कमतरता जाणवू शकते. सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड यांना अपेक्षेप्रमाणे खेळ करता आला नव्हता.हार्दिक पंडय़ाची दुखापत संघासाठी धोकादायक ठरू शकते.

सनरायझर्स हैदराबाद

विजेतेपद : २००९, २०१६

मुख्य आकर्षण : डेव्हिड वॉर्नर

कर्णधार केन विल्यम्सनच्या सनरायझर्स हैदराबादला गतवर्षी विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. परंतु यावेळी त्यांचा संघ अधिक ताकदीने मैदानात उतरणार आहे. धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन हे यामागील मुख्य कारण आहे. मार्टिन गप्टिल, जॉनी बेअरस्टो यांना संघात समाविष्ट केले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा असे भारतीय त्रिकूट त्यांच्याकडे असून फिरकीपटू रशीद खान काय कमाल करू शकतो, हे सर्वानाच माहीत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

उपविजेतेपद : २००९, २०१६

मुख्य आकर्षण : शिम्रॉन हेटमायर

गुणी आणि एकहाती सामना जिंकवून देणाऱ्या असंख्य खेळाडूंचा भरणा असूनदेखील विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला अद्याप एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. एबी डी’व्हिलियर्स आणि कोहली यांच्या साथीला आता विंडीजचा शिम्रॉन हेटमायरदेखील असल्याने संघाची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. मात्र अखेरच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करणारा गोलंदाज बेंगळूरुकडे नाही. ख्रिस वोक्स, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांना कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.

दिल्ली कॅपिटल्स

सर्वोत्तम कामगिरी : २००८ व २०१२मध्ये बाद फेरी

मुख्य आकर्षण : ऋषभ पंत

युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (दिल्ली डेयरडेव्हिल्स) आतापर्यंत एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. उपलब्ध खेळाडूंचा पुरेपूर वापर करण्यात अपयशी ठरत असल्यानेच दिल्लीची अशी अवस्था आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघात पृथ्वी शॉ, ऋषभ पंत या भारताच्या भविष्यातील ताऱ्यांचा समावेश आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने पंतवर विशेष लक्ष असेल. शिखर धवनकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, ख्रिस मॉरिस, विजय शंकर, शाहबाज नदीम यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल.

किंग्ज इलेव्हन पंजाब

उपविजेतेपद : २०१४

मुख्य आकर्षण : वरुण चक्रवर्ती

ख्रिस गेल, लोकेश राहुल, डेव्हिड मिलर यांच्यासारख्या धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असलेल्या रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबला गतवर्षी सुरुवातीच्या पाचपैकी चार सामने जिंकूनसुद्धा बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते. यंदाच्या लिलावात वरुण चक्रवर्तीला ८.४० कोटी रुपयांसह संघात घेत पंजाबने मोठा डाव खेळला आहे. गतवर्षीचा ‘पर्पल कॅप’ विजेता अँड्रय़ू टाय, फिरकीपटू मुझीब-उर-रेहमान असे एकापेक्षा एक गोलंदाज पंजाबच्या ताफ्यात आहेत. परंतु खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत आहे.

राजस्थान रॉयल्स

विजेतेपद : २००८

मुख्य आकर्षण : स्टीव्ह स्मिथ

नवख्या व अननुभवी खेळाडूंनिशीही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता येऊ शकते, हे २००८मध्ये शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सने सिद्ध केले. त्यानंतर राजस्थानची गाडी रुळावरून घसरली. चेंडू फेरफारची शिक्षा भोगून संघात परतलेल्या स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीवर राजस्थानची भिस्त आहे. संजू सॅमसन, अजिंक्य रहाणे, राहुल त्रिपाठी,बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर हे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. मात्र इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुतांश खेळाडू काही सामन्यांना मुकणार असल्याने राजस्थानला मोठा फटका पडू शकतो. जयदेव उनाडकट गोलंदाजीचे नेतृत्व करेल.

कोलकाता नाईट रायडर्स

विजेतेपद : २०१२, २०१४

मुख्य आकर्षण : शुभमन गिल

दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला गतवर्षी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरिन या जिगरबाज विंडीज खेळाडूंवर कोलकाताची भिस्त असून गोलंदाजीत कुलदीप यादव, पीयूष चावला यांची अनुभवी जोडी उपलब्ध आहे. मात्र कमलेश मागरकोटी व शिवम मावी या युवा खेळाडूंना दुखापतीमुळे यंदाच्या ‘आयपीएल’ला मुकावे लागणार असल्याने संघाच्या चिंतेत भर पडली आहे. शुभमन गिल या संघाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. रॉबिन उथप्पा मागील दोन हंगामांपासून झगडताना आढळत आहे.