IPL 2019 स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सलामीचा सामना खेळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. महेंद्रसिंग धोनीदेखील चेन्नईच्या चेपॉक मैदानावर नेटसमध्ये सराव करत आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी चेपॉकच्या मैदानावर गर्दी केली होती. पण त्या चाहत्यांपैकी एकाने सुरक्षा कडे तोडून धोनीची भेट घेतली.

Video : भर मैदानात धोनी आणि चाहत्याची पकडापकडी

धोनी संघातील मार्गदर्शक लक्ष्मीपती बालाजी याच्याबरोबर चर्चा करत असताना एक चाहता मैदानात आला. मुख्य म्हणजे धोनीने देखील त्याला चिडवत मला पकडून दाखव असे इशाऱ्यातून आव्हान दिले. त्यांनतर मैदानावर धोनी आणि चाहत्यामध्ये चक्क पकडापकडीचा खेळ रंगला. धोनीने बालाजीच्या भोवती दोन राउंड फिरत प्रथम चाहत्याला चकवा दिला. त्यानंतर तो पुढे धावू लागला तर चाहता मागे धावू लागला. अखेर एका वेळी तेथील काही लोकांनी त्या चाहत्याला पकडले. पण अखेर धोनीने त्या चाहत्याला भेट दिली आणि हस्तांदोलन केले.

दरम्यान, या आधीदेखील असा प्रसंग घडला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनी आणि चाहत्यामध्ये असाच पकडापकडीचा खेळ रंगला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने १२० चेंडूत ११६ धावा करत एकदिवसीय कारकिर्दीतील ४० वे शतक ठोकले. पण या सामन्यात चर्चा रंगली ती धोनीची…. मध्यंतरानंतर भारतीय संघ मैदानात आला. त्यावेळी एक चाहता धोनीची भेट घेण्यासाठी सरसावला. पण धोनीने मात्र त्या चाहत्याला पटकन भेट दिली नाही. या दोघांमध्ये चक्क पकडापकडीचा डाव रंगला. अखेर स्टंपजवळ जाऊन धोनी थांबला आणि चाहत्याने धोनीला मिठी मारून व त्याच्या पाया पडून त्याची भेट घेतली.

दरम्यान, या सामन्यात झॅम्पाने २ चेंडूत २ बळी मिळवले होते. त्यातील दुसरा बळी हा धोनी होता. धोनी त्या सामन्यात पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता.