कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर, कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याचे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना दिनेश कार्तिकने एका बाजूने संयमी खेळी करत ९७ धावांची खेळी केली. अवघ्या ३ धावांनी कार्तिकचं शतक हुकलं. मात्र या खेळीदरम्यान दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून दुसऱ्या सर्वोत्तम खेळीची नोंद केली आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात ब्रँडन मॅक्युलमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दिनेश कार्तिकने केलेल्या नाबाद ९७ धावा या कोलकात्याच्या फलंदाजाने आयपीएलमध्ये केलेल्या दुसऱ्या सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत.

दरम्यान, पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा स्टिव्ह स्मिथचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने आपली चमक दाखवत कोलकात्याच्या सलामीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडलं.

ख्रिस लिन आणि शुभमन गिल हे कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर या सामन्यात अरॉनचे बळी ठरले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. मात्र श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधार दिनेश कार्तिकने राजस्थानच्या गोलंदाजीचा नेटाने समाचार करत आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरच्या षटकांत दिनेशने कोलकात्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.