आयपीएलच्या बाराव्या हंगामात पंचाच्या निकृष्ट कामगिरीची परंपरा काहीकेल्या थांबत नाहीये. मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील अंतिम सामन्यातही पंचांनी वादग्रस्त निर्णय देत पुन्हा एकदा खेळाडूचा रोष ओढवून घेतला आहे. भारतीय पंच नितीन मेनन यांनी अखेरच्या षटकात ड्वेन ब्राव्होने टाकलेला वाईड चेंडू, वैध ठरवला. या निर्णयाने अचंबित झालेल्या पोलार्डने लगेचच दुसऱ्या चेंडूवर अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला.

चाहत्यांनीही सोशल मीडियावर पंच नितीन मेनन यांचा निषेध नोंदवत पोलार्डला आपला पाठींबा दर्शवला आहे.

डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केल्यानंतर मुंबईचा डाव घसरला. पोलार्डने शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकत चेन्नईच्या गोलंदाजीचा सामना केला. मात्र ब्राव्होने अखेरच्या षटकात टाकलेला वाईड चेंडू पंच नितीन मेनन यांनी वैध ठरवला. यामुळे नाराज झालेल्या पोलार्डने त्यापुढचा चेंडू ‘वाईड बॉल’च्या रेषेवर जाऊन खेळण्यास नकार दिला. अखेर पंच इयान गुल्ड यांनी पोलार्डला समज देत सामना सुरु ठेवला. मात्र पंच नितीन मेनन यांच्या निकृष्ट अंपायरिंगमुळे आयपीएलमधील पंचांच्या कामगिरीची मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.