IPL 2019 हा क्रिकेट महोत्सव सध्या भारतात सुरु आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. १२ मे रोजी या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. मंगळवारी चेन्नईविरुद्ध झालेला सामना जिंकून मुंबईने अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. तर बुधवारी झालेल्या सामन्यात विजेता ठरलेला दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचा विजेता हा अंतिम सामन्यातील दुसरा संघ असणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून सर्व क्रिकेटरसिक या अंतिम सामन्याची वाट पाहत होते. मात्र या सामन्याची सर्व तिकिटे ही केवळ १२० सेकंद म्हणजेच २ मिनिटांत विकली गेली असल्याची माहिती BCCI ने दिली आहे.

मंगळवारी BCCI ने कोणतीही पूर्वसूचना न देता अंतिम सामन्याची तिकिटे विक्रीसाठी खुली केली. ही गोष्ट क्रिकेटरसिकांना अजिबात रुचली नाही. पण त्याहीपेक्षा वाईट गोष्ट पुढे घडली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एका फ्लायरच्या माध्यमातून सकाळी तिकीटविक्री होणार असल्याची माहिती देण्यात आली. पण जेव्हा तिकिटे खरेदी करण्यासाठी क्रिकेटरसिकांनी ऑनलाईन प्रयत्न केला, तेव्हा मात्र तिकिटे पूर्ण विकली गेली असल्याचे दाखवण्यात आले.

यावरून BCCI वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येणार आहे, त्या स्टेडियमची आसन क्षमता ३९ हजारांपेक्षा अधिक आहे. नेहमी अंदाजे २५ ते ३० हजार तिकिटे विकली जातात. पण यावेळी एकूण तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होती याबाबत काहीही कल्पना देण्यात आली नाही.सूत्रांच्या माहितीनुसार १०००, १५००, २०००, २५००, ५०००, १००००, १२५००, १५००० आणि २२५०० या किमतीची तिकिटे विकली जाणे अपेक्षित होती. पण तिकीटविक्री करणाऱ्या इव्हेंट्सनाऊ कंपनीने मात्र १५००, २०००, २५०० आणि ५००० या किमतीची तिकिटे विकली, असे सांगण्यात येत आहे.

मग इतर दराची तिकीटे कुठे गेली? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. तसेच एकूण किती तिकीटविक्री झाली? याबाबतही काही माहिती चाहत्यांना मिळू शकलेली नाही. ‘दोन मिनिटात सगळी तिकिटे कशी विकली जाऊ शकतात? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. अनेक चाहत्यांची अंतिम सामना पाहण्याची इच्छा असते. ती इच्छा धुळीला मिळवलेल्या BCCI ने याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, असे मत हैदराबाद क्रिकेट संघटनेचे माजी सदस्य यांनी व्यक्त केले आहे.

या दरम्यान, आम्ही तिकीटविक्रीची माहिती देऊ शकत नाही. याबाबतची जी माहिती हवी असेल, ती माहिती BCCI ला विचारावी, असे स्पष्टीकरण इव्हेंट्सनाऊचे सुधीर रेड्डी यांच्याकडून देण्यात येत आहे.