सध्या भारतात IPL ची धामधूम सुरु आहे. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असल्याने सर्वच खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी नेट्समध्येही खेळाडूंना घाम गाळावा लागतो आहे. प्रत्येक संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ हे त्यांच्या खेळाडूंकडून कसून सराव करून घेत आहेत. यात अनेक परदेशी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि डेटा अनॅलिस्ट आहेत. त्यामुळे विविध संघातून खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंचे बारकावे सर्व परदेशी प्रशिक्षकांना समजण्यात काहीही अवघड जाणार नाही. त्यातच ३० मे पासून विश्वचषक स्पर्धा सुरु होणार असून या स्पर्धेसाठी निवडले गेलेले भारतीय खेळाडू IPL मध्ये खेळत आहेत. त्यामुळे या परदेशी प्रशिक्षक आणि इतर स्टाफकडून भारताच्या संघाला धोका निर्माण होऊ शकतो, असा सूर सध्या भारतीय क्रिकेटवर्तुळात उमटत आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन हा सध्या तुफान लयीत खेळतो आहे. त्याने IPL च्या सुरुवातीला फारशी चांगली कामगिरी केली नाही. पण गेल्या काही सामन्यात त्याचे अप्रतिम फटकेबाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे भारत या सलामीवीराकडून विश्वचषकात चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत असणार. पण याच संघाच्या मार्गदशक मंडळात रिकी पॉन्टिंगदेखील आहे. विश्वचषकाच्या काही दिवस आधी पॉन्टिंग आणि धवन यांची मैदानावर किंवा क्रिकेट पद्धतीबाबत एकमेकांशी चर्चा होणे हे धवनच्या विश्वचषकातील कामगिरीसाठी धोक्याचे ठरू शकते. कारण पॉन्टिंगला धवनची खेळण्याची आणि फलंदाजीची पद्धती पुरेपूर समजली असणार. अशा परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावताना धवनला धावा करण्यापासून कसे रोखावे किंवा त्याची बलस्थाने माहिती असल्याने त्याला लवकर बाद कसे करावे? याच्या टिप्स तो ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना नक्कीच अचूक देऊ शकतो, असे मत भारतीय क्रिकेट जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत.

हा प्रश्न केवळ दिल्ली कॅपिटल्सच्या धवन आणि पॉन्टिंग इथपर्यंतच मर्यादित नसून इतर संघातदेखील अनेक परदेशी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आहेत. दिल्लीच्या संघासाठी अनॅलिस्ट म्हणून काम पाहणारे श्रीराम सोमयाजुला हे श्रीलंकेच्या संघातही अनॅलिस्ट म्हणून काम पाहतात. पंजाबच्या संघात अनॅलिस्ट म्हणून काम पाहणारे आणि मूळचे चेन्नईचे असलेले प्रसन्न अगोराम हे दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी अनॅलिस्ट म्हणून काम पाहतात. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी अनॅलिस्ट म्हणून काम पाहताना प्रसन्न यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेटतज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या ते IPL मध्ये असताना कामाचा भाग म्हणून त्यांनी नक्कीच भारतीय खेळाडूंची बलस्थाने आणि उणीव यांचा अभ्यास केला असेल. अशा वेळी दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंका या संघांविरुद्ध विश्वचषकात खेळताना नक्कीच इंडियाला परदेशी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्यापासून काहीप्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो अशी भावना सध्या भारतीय क्रिकेटवर्तुळात आहे.