चेन्नई : हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांनी वय हा केवळ एक आकडा असल्याचे आपल्या कामगिरीद्वारे दाखवून दिले आहे. हे दोघेही एखाद्या जुन्या मुरलेल्या वाइनसारखे काळानुरूप अधिकच परिपक्व होत आहेत, अशा शब्दांत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या अव्वल फिरकीपटूंची स्तुती केली आहे.

धोनी स्वत: ३७ वर्षांचा असून हरभजन ३८ तर ताहिर ४० वर्षांचा आहे. मात्र या दोन्ही गोलंदाजांनी कोलकाताविरुद्ध दमदार गोलंदाजी करीत संघाच्या विजयात योगदान दिले. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना धोनीने या दोन्ही गोलंदाजांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘‘हरभजनला जितक्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, त्यात त्याने अत्यंत चांगली कामगिरी केली. गरज असताना इम्रानकडे चेंडू सोपवल्यावर त्याने यश मिळवून दिले आहे. त्यामुळे एकुणातच गोलंदाजी हे आमचे बलस्थान ठरत आहे.’’

‘‘ताहिरवर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अवलंबून राहू शकता. त्याचा माझ्यावरही विश्वास आहे. त्यामुळे मी जेव्हा त्याला विशिष्ट वेगात गोलंदाजी करण्याचा सल्ला देतो, तेव्हा तो त्याचे तंतोतंत पालन करतो. तो चांगला फिरकीपटू तर आहेच, त्याशिवाय तो ‘गुगली’ आणि ‘फ्लिपर’ हे चेंडूदेखील अत्यंत प्रभावीपणे टाकू शकतो. एकुणात ताहिर हा एक अत्यंत चांगले मिश्रण आहे. मात्र जेव्हा आम्ही अधिक धावा बनवणाऱ्या खेळपट्टय़ांवर खेळू आणि मैदान छोटे असेल त्या वेळी सर्वोत्तम संघ कसा निवडायचा त्याचा विचार करावा लागणार आहे,’’ असे धोनीने सांगितले.

खेळपट्टीबाबत असमाधानी

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात पाच सामने जिंकले असले तरी घरच्या चेपॉक स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत असमाधान व्यक्त केले आहे. चेन्नईने घरच्या मैदानावर झालेले आतापर्यंतचे चारही सामने जिंकले असले तरी कमी धावा बनणाऱ्या अशा खेळपट्टय़ांवर खेळणे जिकिरीचे असल्याचे धोनीने म्हटले आहे. ‘‘कमी धावा बनणाऱ्या खेळपट्टीवर खेळावे, असे मला वाटत नाही. अशा खेळपट्टीमुळे चेन्नईतील सामने खूपच कमी धावांचे होत आहेत. ड्वेन ब्राव्होसारखा खेळाडू संघात नसताना तर अशा खेळपट्टय़ांसाठी योग्य संघनिवड अधिकच बिकट बनते,’’ असेही धोनीने नमूद केले.