IPL 2019 MI vs KKR : शेवटच्या साखळी सामन्यात वानखेडे मैदानावर मुंबईने कोलकाताला ९ गडी राखून पराभूत केले. कोलकाताने दिलेले १३४ धावांचे आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सहज पूर्ण केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाली. पराभवामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले. या सामन्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. या आधीही हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला होता, पण हा सामनावीर पुरस्कार स्पेशल असल्याचे हार्दिकने सांगितले.

सामना संपल्यानंतर बोलताना हार्दिक म्हणाला की गोलंदाजीसाठी मला सामनावीराचा पुरस्कार मिळतो आहे याचा मला खूप आनंद आहे. मला या पद्धतीच्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळणे खरंच स्पेशल आहे. जेव्हा तुम्ही फलंदाज म्हणून संघात खेळता, पण तुम्हाला गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळतो तेव्हा त्यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट सुंदर असूच शकत नाही. कारण तुमच्याकडून एखाद्या कामगिरीची अपेक्षा नसते तेव्हा त्या कामगिरीबाबत अजूनच आनंद वाटतो.

कोलकाताकडून शुभमन गिल (९) आणि ख्रिस लिन (४१) जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली होती. मात्र हार्दिक पांड्याने मोक्याच्या वेळी २ बळी टिपत धावगतीवर अंकुश लावला. त्यानंतर कोलकाताच्या संघाकडून कोणालाही फटकेबाजी करता आली नाही. हार्दिकने ३ षटकात २० धावा देत २ बळी घेतले.

यंदाच्या स्पर्धेत हार्दिकच्या उत्तुंग षटकारांचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत समालोचकाने त्याला विचारल्यानंतर हार्दिक म्हणाला की मला लांब आणि उंच उंच षटकार मारण्यासाठी बळ कुठून येते ते मला माहिती नाही. कृणाल मला म्हणतो की मी माझ्या अंगातून ते बळ निर्माण करतो आणि उत्तुंग षटकार खेचतो. पण मी युवा क्रिकेटपटू म्हणून खेळत असल्यापासूनच मोठे षटकार खेचण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित त्यामुळेच मला षटकार खेचण्याची सवय झाली आहे. त्यामुळे मी सवयीचा भाग म्हणून षटकार खेचतो. आणि सध्या मी केवळ चेन्नईविरुद्धच्या आगामी सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असेही त्याने सांगितले.