आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्लीच्या संघाने आश्वास सुरुवात केली आहे. एरवी गुणतालिकेत तळातल्या स्थानावर असणारा दिल्लीचा संघ यंदाच्या हंगामात सर्वोत्तम ४ संघांमध्ये आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाचं घरचं मैदान यावेळी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतंय. गुरुवारी फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीवर ४० धावांनी मात करत विजय मिळवला.

यंदाच्या हंगामात आपल्या घरच्या मैदानावर खेळताना, दिल्लीने ४ पैकी ३ सामने गमावले आहेत. केवळ एका सामन्यात दिल्लीचा संघ विजयी ठरला असून तो विजयही दिल्लीला सूपरओव्हरमध्ये मिळाला आहे. याउलट बाहेरच्या मैदानांवर दिल्लीच्या संघाने ५ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर आपली कामगिरी सुधारण्यासाठी दिल्लीच्या संघाला काही नवीन उपाययोजना आखावी लागणार आहे.

दरम्यान मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने दिल्लीच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र राहुल चहरने दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. धवन आणि पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या आक्रमणाची धार धारदार करत दिल्लीचा बॅकफूटला ढकललं. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, कॉलिन मुनरो हे फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीत.

अखेरच्या फळीत अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिस यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दिल्लीसमोरचं आव्हान हे अशक्यप्राय अवस्थेत गेलं होतं. अखेरीस मुंबईने धावांनी विजय मिळवत गुणतालिकेतलं दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. मुंबईकडून राहुल चहरने ३, जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले. त्यांना लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.