IPL स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना धोनीच्या चेन्नई आणि विराटच्या बंगळुरू संघात होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माच्या मुंबईचा सामना दिल्लीच्या संघाशी होणार आहे. दिल्लीच्या संघात नव्या दमाच्या खेळाडूंचा भरणा आहे. या संघातील ऋषभ पंत याने एक कबुली दिली आहे. मी इतर कोणालाही घाबरत नाही पण विराट कोहलीच्या रंगाची मला भीती वाटते, असे पंतने सांगितले आहे.

गेले ११ हंगाम दिल्ली डेअरडेव्हिल्स या नावाने खेळणारा संघ यावेळी दिल्ली कॅपिटल्स या नावाने मैदानात उतरणार आहे. नावाबरोबरच कामगिरीत बदल करून यंदा IPL च्या चषकावर नाव कोरण्यासाठी संघ उत्सुक आहे. मात्र या आधी त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत वेबसाईटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ऋषभ पंतने आपल्याला विराट कोहलीच्या रागाची भयंकर भीती वाटते असे म्हटले आहे. ‘जर तुम्ही एखादी गोष्ट योग्य पद्धतीने करत असाल, तर तो तुमच्यावर का रागावेल? पण तुम्ही जर चूक केलीत आणि त्यामुळे तुमच्यावर कोणी चिडले, तर मात्र तुम्हाला त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी आणि त्या चुकांमधून शिकायला हवे, असेही पंतने स्पष्ट केले.

ऋषभ पंतने भारताकडून आणि IPL मध्येदेखील काही झंझावाती खेळी केल्या आहेत. याचबरोबर टीम इंडियामध्ये धोनीच्या निवृत्तीनंतर ऋषभ पंत याला त्याचा वारसदार म्हणून स्थान जवळपास निश्चित आहे. मात्र त्याच्या यष्टिरक्षण कौशल्याबाबत कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात धोनीसारखा रन-आऊट करण्याचा प्रयत्न करताना पंतकडून १ धाव दिली गेली होती. त्यावर विराट पंतवर भडकला होता.