आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर मात करुन दिल्लीने प्ले-ऑफ (बाद फेरी) मध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला. घरच्या मैदानावर दिल्लीने बंगळुरुवर १६ धावांनी मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेलं १८८ धावांचं आव्हान बंगळुरुचा संघ पूर्ण करु शकला नाही. या विजयासह दिल्लीची तब्बल ७ वर्षांची प्रतिक्षा फळाला आली आणि २०१२ नंतर प्रथमच दिल्लीचा संघ प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरला.

या संघाबाबत बोलताना दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर सौरव गांगुली म्हणाला की आमच्या संघात अनुभवाचा अभाव अजिबात नाही. आमच्या संघात युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांचे उत्तम मिश्रण आहे. शिखर धवन याच्यासारखा अनुभवी खेळाडू आमच्या संघात आहे. तो खेळताना त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास असल्याचे दिसून येते. त्याचा फॉर्म आमच्या संघासाठी अतिशय महत्वाचा होता. सुदैवाने त्याने चांगली कामगिरी केली.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीने संघात फार बदल केले नाहीत. उलट त्यांनी आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वास सार्थ ठरवला. याच खेळाडूंमुळे दिल्लीला प्ले ऑफ्सचा टप्पा गाठता आला, असेही गांगुली म्हणाला.

दरम्यान, गेल्या काही हंगामांमध्ये दिल्लीच्या संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. मात्र बाराव्या हंगामात दिल्लीच्या व्यवस्थापनात झालेले बदल, खेळाडूंची योग्य निवड आणि प्रशिक्षकांची साथ या जोरावर दिल्लीने यंदा ही किमया साधली. दुसरीकडे दिल्लीने पराभव केलेल्या बंगळुरुच्या खराब कामगिरीचा सिलसिला या हंगामातही तसाच सुरु आहे. गुणतालिकेत तळाशी असलेल्या बंगळुरुने रविवारच्या सामन्यात आपल्या शंभराव्या पराभवाची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १०० पराभव झेलणारा बंगळुरु तिसरा संघ ठरला आहे.