आयपीएलच्या बाराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ प्ले-ऑफ च्या शर्यतीत दाखल होण्यापासून अवघी काही पावलं दूर आहे. मंगळवारी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने अटीतटीच्या लढतीत सनराईजर्स हैदराबादवर मात केली. धोनी सध्या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. मात्र अजुनही धोनी आपली पाठीची दुखापत घेऊन मैदानात उतरतो आहे. हैदराबादविरुद्ध सामन्यानंतर खुद्द धोनीने याची कबुली दिली.

“मला पाठदुखीचा त्रास अजुन जाणवतो आहे. हे दुखणं अजुन वाढलेलं नाहीये, ३० मे पासून सुरु होणारा विश्वचषक लक्षात घेता हे दुखणं वाढणं मला परवडणारं नाही. मात्र आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असूनही खेळत आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडतेय असं मला वाटलं तर मी आयपीएलमधून काहीकाळासाठी जरुर विश्रांती घेईन”, धोनी बोलत होता.

दरम्यान, सलामीवीर शेन वॉटसनचं आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर, चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सनराईजर्स हैदराबादवर ६ गडी राखून मात केली आहे. वॉटसनने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ९६ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने वॉटसनला यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. अवघ्या ४ धावांनी वॉटसनचं शतक हुकलं. या विजयासह चेन्नईने पुन्हा एकदा आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे.