आयपीएलच्या बाराव्या हंगामात गतविजेच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाची वाटचाल मोठ्या धडाकेबाज पद्धतीने सुरु आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ आपलं अव्वल स्थान कायम राखून आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नईने फक्त एकदा पराभवाचा सामना केला आहे. घरचं मैदान असो व घराबाहेरचं, चेन्नईचा संघ प्रतिस्पर्ध्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवतो आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरील सामन्यातही चेन्नईच्या गोलंदाजांनी आश्वासक मारा करत कोलकात्याला १६१ धावांवर रोखलं.

चेन्नईकडून अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीरने कोलकात्याच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने ४ फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीदरम्यान ताहीरने दोन अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलमध्ये ४० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वयात ४ बळी घेणाऱ्यांच्या यादीत ताहीर चौथ्या स्थानावर पोहचला आहे.

याचसोबत ताहीरने ३५ व्या वर्षानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीतही पहिलं स्थान पटकावलं आहे. ताहीरने मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, आशिष नेहरा, अनिल कुंबळे यांना मागे टाकलं आहे.

रविवारी कोलकात्याविरुद्ध सामन्यात ताहीरने ख्रिस लिन, नितीश राणा, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेलचा बळी घेतला.