IPL 2019 : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले. काहीशी वेगळी गोलंदाजी शैली असलेल्या बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले. मुंबईने चेन्नईवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. त्यामध्ये बुमराहची अखेरच्या दोन षटकातील गोलंदाजी महत्वपूर्ण ठरली.

बुमराहने त्याच्या ४ षटकांमध्ये १४ धावा देत दोन गडी बाद केले. जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा भारताला जिंकायची असेल तर बुमराहला महत्वाची भूमिका बजावावी लागेल. सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी अजूनही बाकी आहे, असे मत मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केले.

यावर जसप्रीत बुमराहने सचिनला ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘ सचिन सरांनी केलेली स्तुती ऐकून मी पूर्णपणे निःशब्द झालो आहे. सचिन सर तुमचे मनापासून आभार’, अशा शब्दात बुमराहने ऋण व्यक्त केले.

बुमराह त्याची अखेरची दोन षटके टाकण्यासाठी आला, त्या आधीच्या षटकात लसिथ मलिंगाने २० धावा दिल्या होत्या. बुमराहने आपल्या पहिल्या दोन षटकात अंबाती रायडूच्या विकेटसह फक्त सहा धावा दिल्या होत्या. बुमराहची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. त्यामुळे तो नक्की कसा चेंडू टाकेल? चेंडू कोणत्या गतीने येईल? याचा फलंदाजालाही अंदाज बांधता येत नाही, अशा शब्दात मुंबई इंडियन्स संघातील सहकारी युवराज सिंग बुमराहबद्दल बोलताना म्हणाला.