कर्णधार कायरन पोलार्डच्या 83 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबवर 3 गडी राखून मात केली. पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचे फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. मात्र रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या कायरन पोलार्डने संघाची बाजू लावून धरली. अखेरच्या षटकांमध्ये पोलार्डने आपल्या फलंदाजीचा दाणपट्टा असा काही फिरवला की पंजाबच्या सर्व गोलंदाजांना त्याचा तडाखा बसला. 83 धावांच्या खेळीत पोलार्डने तब्बल 10 षटकार ठोकले. या दरम्यान टी-20 क्रिकेटमध्ये पोलार्डने आपल्या नावावर आणखी एका भीमपराक्रमाची नोंद केली आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये कायरन पोलार्डने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 600 षटकारांचा पल्ला ओलांडला आहे. 31 वर्षीय पोलार्डच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये आताच्या घडीला 602 षटकार जमा आहेत. कायरन पोलार्डने आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये विंडीजच्या संघासोबत 15 स्थानिक संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. पोलार्ड टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डचा विंडीजचा साथीदार ख्रिस गेल या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या सिद्धेश लाडने डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र या आक्रमक सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करणं त्याला जमलं नाही. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने काहीकाळ पोलार्डची चांगली साथ दिली. यानंतर मुंबईचा डाव परत कोलमडला. मात्र यानंतर अल्झारी जोसेफच्या साथीने पोलार्डने मुंबईला परत विजयाच्या समीप आणून ठेवलं. मुंबई सामना जिंकणार असं वाटत असताना पोलार्ड अखेरच्या षटकात बाद झाला. अखेरीस अल्झारी जोसेफ आणि चहर यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – IPL 2019 : ५ वर्षांची प्रतीक्षा, पहिल्याच चेंडूवर षटकार ! सिद्धेश लाडनं जिंकली मनं