IPL ही स्पर्धा २३ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील साखळी सामन्यांचे वेळापत्रक मंगळवारी BCCI ने जाहीर केले. यंदाही IPL चे सामने दरवर्षीप्रमाणे घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर अशाच प्रकारे रंगणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका असल्याने IPL मधील काही सामन्यांच्या जागा हलवण्यात येतील किंवा काही सामन्यांना कात्री लावलीय जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण तसे काहीही होणार असून यंदाही नेहमीप्रमाणेच IPL चे सामने रंगणार आहेत.

IPL च्या स्पर्धेत यंदा सर्वाधिक महागडी खरेदी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने केली आहे. त्यांनी वरुण चक्रवर्ती या नवोदित खेळाडूला ८ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले. त्यामुळे त्याच्या आणि पंजाबच्या खेळीकडे साऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे. मात्र ही स्पर्धा सुरु होण्याआधी पंजाबच्या संघाने पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहीद झाले होते. त्यातील पाच जवान हे पंजाब आणि हिमाचल प्रदेश परिसरातील होते. या जवानांच्या कुटुंबीयांना पंजाबच्या संघ व्यवस्थापनाकडून २५ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा कर्णधार रविश्चंद्र अश्विन आणि CRPF चे उपमहानिरीक्षक व्ही. के. कौंदल यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. शहीद सीआरपीएफ जवान जयमल सिंग, सुखजिंदर सिंग, मनिंदर सिंग, कुलविंदर सिंग आणि तिलक राज यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५-५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) च्या ४० जवानांना हौतात्म्य स्विकारावं लागलं होतं. या हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र संतापाची लाट पसरली. या घटनेनंतर समाजातील प्रत्येक जण आपापल्या परीने शहीद परिवाराच्या कुटुंबीयांना मदत करत आहे. अनेक सामाजिक संस्था या कार्यात मोलाच्या भूमिका बजावत आहेत.