IPL 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या स्वैर माऱ्याच्या जोरावर कोलकात्याविरुद्ध बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. आंद्रे रसेलने फटकेबाजी करत एका क्षणाला अशक्यप्राय वाटणारे २०६ धावांचे आव्हान संघाला सहज पूर्ण करुन दिले. ५ गडी राखून सामना जिंकत कोलकात्याने बंगळुरुच्या प्रयत्नावर पुन्हा एकदा पाणी फिरवले.

शेवटच्या ४ षटकात कोलकाताला विजयासाठी ६६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी आंद्रे रसेलने तुफानी खेळी करत १३ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ४८ धावा चोपल्या. त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी याला एकाच षटकात ४ षटकार आणि १ चौकार हाणत कोलकाताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याच्या या खेळीमुळे खुश झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा सह-संघमालक शाहरुख खान याने एक खास फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये बाहुबली चित्रपटातील नायकाचा वेष आणि त्यावर रसलचा चेहरा असा फोटो त्याने ट्विट केला आहे.

तसेच त्याने रसल आणि इतर खेळाडूंचे कौतुकही केले आहे. दरम्यान, सलग चार पराभव पदरी पडल्यानंतर बंगळुरुच्या संघाने कोलकात्याविरुद्ध सामन्यात आपल्या कामगिरीमध्ये चांगली सुधारणा केली. नवदीप सैनीने सुनिल नरिनला बाद करत कोलकात्याला पहिला धक्का दिला. यानंतर ख्रिल लिन, रॉबिन उथप्पा जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. या दोन्ही कोलकात्याच्या डावाला आकार दिला. मात्र रॉबिन उथप्पा माघारी परतल्यानंतर कोलकात्याचा एक-एक फलंदाज हजेरी लावून माघारी परतले. मात्र अखेरच्या षटकात आंद्रे रसेल आणि शुभमन गिल जोडीने फटकेबाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला. बंगळुरुकडून पवन नेगी आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2-2 तर युझवेंद्र चहलने 1 बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स यांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला बाराव्या हंगामात अखेरीस सूर सापडला. घरच्या मैदानावर खेळत असताना, बंगळुरुने आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर 205 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने 84 धावांची खेळी केली. त्याला सलामीवीर पार्थिव पटेल आणि एबी डिव्हीलियर्सनेही चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय चुकला. पार्थिव पटेल आणि विराट कोहली यांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेत, पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. अखेरीस नितीश राणाने पार्थिवला माघारी धाडत बंगळुरुला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर विराटने डिव्हीलियर्सच्या साथीने फटकेबाजी सुरुच ठेवली. काही वेळाने डिव्हीलियर्सनेही आपल्या जुन्या रंगात येत कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराटपाठोपाठ डिव्हीलियर्सनेही आपलं अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिव्हीलियर्सही सुनिल नरीनचा शिकार बनला. त्याने 32 चेंडूत 63 धावा केल्या. कोलकात्याकडून सुनिल नरीन, नितीश राणा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.