IPL 2019 KKR vs RCB : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शुक्रवारी हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्याच मैदानात १० धावांनी मात देत बंगळुरुने धडाकेबाज कामगिरी केली आहे. २१४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र मधल्या फळीत नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करत कोलकाताला आशा दाखवल्या. पण अखेर संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

या सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी केली. विराटने ५८ चेंडूत १०० धावा फटकावल्या. कोलकात्याच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराटने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. या खेळीदरम्यान विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचला. कोहलीचं आयपीएलमधलं हे पाचवं शतक ठरलं. कोहलीने डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, एबी डिव्हीलियर्स यांना मागे टाकलं. कोहलीच्या हा पराक्रम आणि बंगळुरूला विजय अशा दुहेरी गोष्टींमुळे खुश होऊन त्याने विराटला ‘लिटल बिस्कीट’ असं झकास टोपणनाव प्रदान केलं. ट्विट करत त्याने हे नाव कोहलीला दिलं आणि सोबतच मोईन अलीच्या खेळीचीही स्तुती केली.

डीव्हिलियर्सने दिलेल्या या टोपणनावावर चाहतेदेखील एकदम खुश झाले.

दरम्यान, सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडलं. यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. नितीश आणि रसेल या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. नितीश राणाने नाबाद ८५ तर रसेलने ६६ धावा केल्या.

त्याआधी, कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरुच्या फलंदाजांनी आज आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.