अतिशय रोमांचक लढतीत राजस्थानच्या संघाने कोलकाताला ३ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात १७ वर्षाच्या रियान पराग याने साहसी खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकांमध्ये रियान पराग याने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि २ षटकार लगावले. पण केवळ ३ धावांमुळे त्याचा एक मोठा विक्रम हुकला.

रियान परागला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तो उत्तम फलंदाजी करत असताना त्याची बॅट स्टंपला लागून तो स्वयंबाद झाला. त्यामुळे IPL च्या इतिहासात सर्वात तरुण अर्धशतकवीर होण्याची संधी त्याच्याकडून हुकली. सध्या पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन या दोघांच्या नावावर संयुक्तपणे हा विक्रम आहे. दोन्ही खेळाडूंनी वयाच्या १८व्या वर्षी IPL मध्ये अर्धशतक ठोकले होते. हा विक्रम मोडण्याची संधी रियान होती, पण त्याच्या दुर्दैवाने तो हिट विकेट झाला.

एका क्षणाला संकटात सापडलेल्या राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं आव्हान रियानच्या फलंदाजीमुळे पूर्ण केलं. ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत असताना रियान परागने अखेरच्या काही षटकांत जोफ्रा आर्चरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. नरीनने रहाणेला माघारी धाडल्यानंतर राजस्थानच्या डावाला खिंडार पडलं. संजू सॅमसन, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी ठराविक अंतराने माघारी परतले. अखेरीस रियान परागने जोफ्रा आर्चरच्या साथीने फटकेबाजी करत राजस्थानला विजयपथावर आणून ठेवलं. कोलकात्याकडून पियुष चावलाने ३, सुनील नरीनने २ तर प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, घरच्या मैदानावर खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा स्टिव्ह स्मिथचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने आपली चमक दाखवत कोलकात्याच्या सलामीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडलं.

ख्रिस लिन आणि शुभमन गिल हे कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर या सामन्यात अरॉनचे बळी ठरले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. मात्र श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. दिनेश कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद ९७ धावा केल्या.

मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधार दिनेश कार्तिकने राजस्थानच्या गोलंदाजीचा नेटाने समाचार करत आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरच्या षटकांत दिनेशने कोलकात्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. राजस्थानकडून वरुण अरॉन अष्टपैलू चमक दाखवली. त्याने दोन बळींसोबत एक झेल आणि धावबादही केला. याव्यतिरीक्त ऑशने थॉमस, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.