किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलने, मुंबईच्या वानखेडे मैदानात आपल्या आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत लोकेश राहुलने नाबाद शंभर धावा पटकावल्या. राहुलच्या या आक्रमक खेळीच्या जोरावर पंजाबने 197 धावांपर्यंत मजल मारली. आयपीएलच्या बाराव्या हंगामात शतक ठोकणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी संजू सॅमसन, डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो यांनी शतकं झळकावली आहेत.
“खेळ सुरु व्हायच्या आधी मी आणि ख्रिस गेलने 200 धावांचा टप्पा ओलांडायला हे ठरवलं होतं. मात्र मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट गमावल्यामुळे ते शक्य झालं नाही. ख्रिस माघारी परतल्यानंतर आमची लय बिघडली होती. मात्र अखेरच्या षटकात मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतला.” लोकेश राहुल सामना संपल्यानंतर समालोचक संजय मांजरेकर यांच्याशी बोलत होता.
लोकेश राहुलने 64 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या शतकी खेळीसोबत लोकेश राहुल बाराव्या हंगामात शतक ठोकणारा तिसरा सलामीवीर ठरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 10, 2019 10:41 pm