आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘कॅप्टन कूल’ नावाने परिचीत असलेल्या धोनीने आतापर्यंत यष्टींमागून अनेक खेळाडूंना जाळ्यात अडकवलं आहे. मात्र आयपीएलच्या बाराव्या हंगामात, धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात युवा खेळाडू रियान परागचा झेल पकडत एक अनोखी कामगिरी आपल्या नावे जमा केली आहे.

धोनीने रियान पराग आणि त्याचे वडील पराग दास यांना बाद केल्याची एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही बाब उघड केली आहे.

रियान परागला माघारी धाडल्याच्या आधी धोनीने त्याचे वडील पराग दास यांनाही बाद केलं होतं. धोनीने १९९९-२००० या हंगानात बिहारकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले होते. धोनी इस्ट झोनच्या लीगमध्ये आसामविरुद्ध सामना खेळला होता. या सामन्याच्या दुसऱ्या डावात धोनीने रायनचे वडिल पराग यांना यष्टीचीत केले होते. दास यांनी या सामन्यात २४ चेंडूंत ३० धावा बनवल्या होत्या. हा सामना बिहारच्या संघाने १९१ धावांनी जिंकला होता.