इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघापाठोपाठ किंग्ज इलेव्हन पंजाब संघावरही बंदीची टांगती तलवार आहे. पंजाबचे सहमालक नेस वाडिया याला जपानमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे वाडिया आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जर चेन्नई आणि राजस्थान यांच्यावर स्पॉटफिक्सींग प्रकरणी कारवाई होऊ शकते, तर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पंजाब च्या संघावरही बंदीची कारवाई व्हायला हवी अशी मागणी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केली आहे.

अवश्य वाचा – आईच्या आठवणीने भावुक झाला जसप्रीत बुमराह

वाडिया उद्योग समुह देशातील सर्वात जुन्या समुहांपैकी एक आहे. या समुहाच्या संचालक कुटुंबातील नेस वाडिया हा महत्वाचा सदस्य आहे. Finincial Times ने दिलेल्या वृत्तानुसार मार्च महिन्यामध्ये न्यू चिटोज विमानतळावर नेस वाडियाकडे २५ ग्राम गांजा सापडला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. “स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ड्रग्स बाळगणे हा त्यापेक्षा मोठा गंभीर गुन्हा आहे आणि त्यामुळे वाडियासह संघावरही कठोर कारवाई करण्यात यावी. एका संघाला एक न्याय अन् दुसऱ्याला दुसरा…असे का? वाडियावर क्रिकेट संदर्भात आजीवन बंदी घालावी,” अशी मागणी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली आहे.

वाडियाच्या या कृत्यामुळे पंजाब संघाचे भविष्यही धोक्यात आणले आहे. आयपीएलच्या नियमानुसार संघ खेळाडू, संघाचा पदाधिकारी व अन्य कोणत्याही सदस्याने आपला संघ आणि बीसीसीआयची प्रतिष्ठा धुळीस मिळेल अशा कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसावे. मात्र वाडियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे पंजाबच्या संघावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती कळते आहे.

जपानमध्ये पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. यामुळे वाडियाला अटक करून त्याला तत्काळ शिक्षा सुनावण्यात आली. या बातमीमुळे वाडिया समूहातील कंपन्यांचे समभाग काही प्रमाणात कोसळले आहेत. बॉम्बे डाईंगचे समभाग १७.३ टक्क्यांनी घसरले आणि बॉम्बे बर्माचे समभाग ६ टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे नेस वाडिया यांच्याविरोधात अभिनेत्री प्रीती झिंटाने २०१४ साली मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार देखील दाखल केली होती.