IPL 2019 KXIP vs RR : पंजाबने मोहालीच्या मैदानावर पाहुण्या राजस्थानला १२ धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (५२) आणि मिलरची फटकेबाज खेळी (४०) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्यामुळे राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. मात्र या सामन्यात पंजाबला दोन मोठे धक्के बसले.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मोझेस एन्रिके हा मंगळवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाकडून IPL पदार्पण करणार होता, पण तो दुखापतग्रस्त झाला. सामन्याआधी मैदानावर सराव करताना झेल घेताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्याला ऐन वेळी सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याचे पंजाबकडून IPL पदार्पण लांबणीवर पडले. तसेच सामना सुरु असताना पंजाबचा ‘मिस्ट्री स्पिनर’ मुजीब ऊर रहमान याला चौकार अडवताना खांद्याला दुखापत झाली. त्या दुखापतीनंतर तो लगेच मैदानावरून बाहेर गेला आणि त्याच्या जागी सॅम करन हा मैदानावर राखीव खेळाडू म्हणून आला. मुजीबाने केवळ ३ षटकेच टाकली होती. या दुखापतीमुळे त्याला चौथे षटक टाकता आले नाही. या दोघांच्याही दुखापतीनंतर पुढील सामन्यांतील त्यांच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या या हंगामातील साखळी सामान्यांचा महत्वाचा टप्पा सुरु आहे. अशा वेळी दोन परदेशी खेळाडू जायबंदी होणे पंजबाच्या संघाला नक्कीच परवडणारे नाही.

दरम्यान, १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत असलेला जोस बटलर झेलबाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. बटलरने १ चौकार आणि २ षटकार खेचत २३ धावा केल्या. अश्विनला आडवा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन त्रिफळाचीत झाला. सॅमसनने २१ चेंडूत २७ धावा केल्या.अजिंक्य रहाणेच्या ऐवजी सलामीला आलेला राहुल त्रिपाठी अर्धशतक करून माघारी परतला आणि राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याने ४५ चेंडूत ५० धावा केल्या. धोकादायक फलंदाज टर्नर हा मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि राजस्थानला चौथा धक्का बसला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा जोफ्रा आर्चरदेखील लवकर बाद झाला.पाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे फटकेबाजीच्या नादात बाद झाला. त्याने २१ चेंडूत २६ धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीने फटकेबाजीत करत ११ चेंडूत ३१ धावा केल्या. पण त्याची फटकेबाजी राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही.

त्याआधी, राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तडाखेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल बचावात्मक फटका खेळताना माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. गेलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार खेचत ३० धावा केल्या. नव्या दमाचा मयंक अग्रवाल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने १२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार यांच्या साहाय्याने २६ धावा केल्या. अतिशय शांत आणि संयमी सुरुवात केलेल्या सलामीवीर लोकेश राहुलने चौकार लगावत ४५ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल माघारी परतला. राहुलने ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. निकोलस पुरन ६ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. मनदीप फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मिलरने पंजाबच्या धावसंख्येत भर घालत मोलाचा वाटा उचलला. त्याने ४० धावा केल्या. अखेरच्या षटकात अश्विनने ४ चेंडूत १७ धावा करत पंजाबला १८२ धावांचा पल्ला गाठून दिला.