IPL 2019 KXIP vs SRH : अखेरच्या षटकात निर्णायक चौकार मारून लोकेश राहुलने पंजाबला हैदराबादवर ६ गडी राखून विजय मिळवून दिला. डेव्हिड वॉर्नरची अर्धशतकी खेळी आणि शेवटच्या षटकातील दिपक हुडाची फटकेबाजी याच्या जोरावर हैदराबादने २० षटकात ४ बाद १५० धावा केल्या आणि पंजाबपुढे विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलने धमाकेदार ७१ धावांची नाबाद खेळी केली. त्याला मयंक अग्रवालने (५५) चांगली साथ दिली.

या सामन्यात सहाव्या षटकात एक प्रकार घडला. या स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसात अश्विन – जोस बटलरचं ‘मंकडिंग’ प्रकरण चांगलेच गाजले होते. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार अश्विन याने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला ‘मंकडिंग’ करुन बाद केले होते. त्यामुळे याच गोष्टीचा धसका घेत डेव्हिड वॉर्नरने अश्विन गोलंदाजी करत असताना चक्क पटकन बॅट क्रीजच्या आतमध्ये ठेवली. हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर नॉन स्ट्रायकर एन्डला होता. अश्विनच्या गोलंदाजीच्या वेळी त्याने स्वत:ची बॅट क्रिजमध्येच राहिल याची योग्य पद्धतीने काळजी घेतली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सामन्यात १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. फटकेबाज सुरुवात केलेला ख्रिस गेल लवकर बाद झाला. त्याने १४ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत १६ धावा केल्या. पण आणखी एक उत्तुंग षटकार लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. गेल बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे पंजाबला सामन्यात भक्कम स्थिती प्राप्त झाली. सतत फलंदाजीवर टीका होणाऱ्या राहुलने सामन्यात अर्धशतक झळकावले. याबरोबरच पंजाबनेही शतकी मजल मारली. राहुल पाठोपाठ मयंक अग्रवालनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली. अर्धशतक झाल्यानंतर मयंक लगेच बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ५५ धावा केल्या. अनुभवी डेव्हिड मिलर उंच फटका मारून झेलबाद झाला आणि सामन्यात रंगत वाढली. मिलरने केवळ १ धाव केली. पाठोपाठ मनदीप सिंगदेखील मोठा फटका खेळताना झेल बाद झाला आणि सामन्यात रंगतदार ‘ट्विस्ट’ आला. अखेर शेवटच्या षटकात योग्य वेळी चौकार लगावत आणि त्यानंतर चपळाईने दुहेरी धाव घेत राहुलने पंजाबला विजय मिळवून दिला.

त्याआधी हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला फिरकीपटू मुजीब ऊर रहमान याच्या गोलंदाजीच्या जाळ्यात तडाखेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टो अचूक अडकला. बेअरस्टोला ६ चेंडूत केवळ १ धाव जमवता आली आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. कर्णधार अश्विनने त्याचा झेल टिपला. बेअरस्टोला स्वस्तात बाद केल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे अतिशय संथ सुरुवात करणाऱ्या हैदराबादचे ११ व्या षटकात अर्धशतक झाले. अतिशय सावध खेळ करणारा विजय शंकर अखेर बाद झाला. चेंडूला बॅटने हलकेच दिशा देण्याच्या प्रयत्नात त्याचा यष्टिरक्षकाने झेल टिपला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. विजयने २७ चेंडूत २ चौकारांसह २६ धावा केल्या. डावाला संथ सुरुवात झाल्यामुळे हैदराबादने मोहम्मद नबीला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती दिली. पण त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याने ७ चेंडूत १२ धावा केल्या. दुसरीकडे अतिशय शांत आणि संयमी खेळी करत डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरली आणि ४९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मनीष पांडेने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तो २ चौकार लागवण्यातच यशस्वी झाला. त्याने १५ चेंडूत १९ धावा केल्या. वॉर्नरने डावाच्या अखेरपर्यंत झुंज देत ६२ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ७० धावा केल्या. तर शेवटचे तीन चेंडू वाट्याला आलेला दीपक हुडा याने २ चौकार आणि १ षटकार लगावत नाबाद १४ धावा केल्या.