आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा चेन्नई सुपरकिंग्जवर मात केली. चेन्नईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ४६ धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत आपलं दुसरं स्थान कायम राखलं. १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १०९ धावांपर्यंत मजल मारु शकला. लसिथ मलिंगाने ४ बळी घेत चेन्नईच्या डावाला खिंडार पाडलं.

या कामगिरीसह मलिंगाने आयपीएलच्या इतिहासात एका संघाविरोधात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. चेन्नईविरुद्ध मलिंगाने आयपीएलमध्ये ३० बळी घेतले आहेत. उमेश यादवच्या नावावर असलेला २९ बळींचा विक्रम मलिंगाने आपल्या नावावर केला आहे. उमेश यादवने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विरोधात २९ बळी घेतले आहेत. तर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने मुंबई इंडियन्स विरोधात २८ बळी घेतले आहेत.

अवश्य वाचा – IPL 2019 : मुंबईचा हिटमॅन ठरतोय चेन्नईच्या किंग्जची डोकेदुखी, जाणून घ्या…

महेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती चेन्नईला चांगलीच भोवली. धोनीच्या अनुपस्थितीत रैनाने संघाचं नेतृत्व केलं, मात्र तो फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. मलिंगाने गोलंदाजीदरम्यान शेन वॉटसन, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, हरभजन सिंह यांना माघारी धाडलं.