‘मंकडिंग’बाबत ‘एमसीसी’चे घूमजाव

लंडन : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनने ‘मंकडिंग’ पद्धतीने जोस बटलरला धावचीत केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात क्रिकेटच्या नियमावली ठरवणाऱ्या मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) घूमजाव केले आहे. अश्विनची कृती ही खिलाडूवृत्तीची नव्हती, असे ‘एमसीसी’ने म्हटले आहे.

समोरच्या बाजूला (नॉनस्ट्रायकर एंड) उभ्या असलेल्या बटलर अश्विनने धावचीत केल्याच्या घटनेबाबत सुरुवातीला ‘एमसीसी’ने पाठिंबा दिला होता. मात्र २४ तासांत त्यांनी आपले मत बदलले आहे.

‘‘आम्ही घटनेचा पुन्हा आढावा घेतला. त्या वेळी हे खेळभावनेशी पूरक असल्याचे जाणवले नाही. अश्विनने चेंडू टाकण्यासाठी क्रिझपर्यंत पोहोचण्यास बराच वेळ घेतला. त्यामुळे चेंडू टाकला जाईल, असाच समज बटलरचा झाला,’’ असे ‘एमसीसी’चे नियमावली व्यवस्थापक फ्रेझर स्टीवर्ट यांनी सांगितले.

‘एमसीसी’ने मंगळवारी आपल्या निवेदनात म्हटले होते की, ‘‘गोलंदाजाने समोरच्या बाजूच्या फलंदाजाला बाद करण्यापूर्वी ताकीद देण्याची मुळीच आवश्यकता नाही. अशा प्रकारे फलंदाजाला बाद करणे हे खिलाडूवृत्तीला बाधक नसते.’’

‘एमसीसी’ने आपल्या ताज्या पत्रकात समोरच्या बाजूच्या फलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी रेषा ओलांडू नये, असे स्पष्ट म्हटले आहे. ‘एमसीसी’ने घूमजाव केल्याचे मात्र स्टीवर्ट यांनी फेटाळले आहे.

हे तुम्हाला माहीत आहे?

’ क्रिकेटच्या नियमांची जबाबदारी १७८८पासून ‘एमसीसी’कडे आहे. नियमांमधील बदल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) जरी निश्चित करीत असली तरी ‘एमसीसी’कडे त्याचे स्वामित्व हक्क आहेत.