IPL 2019 MI vs CSK : स्पर्धेतील Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण धोनीचा हा निर्णय चेन्नईसाठी सुरुवातीच्या षटकांत फारसा फायदेशीर ठरला नाही. चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली. एक जीवनदान मिळाल्यानंतर त्या संधीचा फायदा डु प्लेसिसला घेता आला नाही. तो एका चौकारासह ६ धावा करून माघारी परतला. चांगल्या लयीत असलेला सुरेश रैना स्वस्तात बाद झाला. षटकात आधीच फ्री हिटवर चौकार मिळाल्यानंतर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि तो जयंत यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या.

दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर शेन वॉटसनने संयमी सुरुवात केली, पण नंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो देखील मोठा फटका खेळून बाद झाला. जयंत यादवने उलट धावत जाऊन त्याचा अप्रतिम झेल टिपला. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर मुरली विजयने २ चौकार लगावले होते. शेन वॉटसनवर डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि जयंत यादवने मागे धावत जाऊन अप्रतिम झेल टिपला.

केदार जाधव दुखापतग्रस्त असल्याने संधी मिळालेला मुरली विजय चांगली सुरुवात केल्यानंतर यष्टिचीत झाला. मुरली विजयला काही कळण्याआधीच यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने यष्ट्या उडवून त्याला माघारी धाडले. मुरली विजयने २६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या.

दरम्यान, दोनही संघांनी १-१ बदल केला. मुंबईने डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन याला वगळून त्याच्या जागी फिरकीपटू जयंत यादवला संधी दिली आहे. तर चेन्नईच्या केदार जाधवला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली असून त्या जागी मुरली विजयला संघात स्थान मिळाले आहे. या स्पर्धेत आतपर्यंत हे दोन संघ २ वेळा आमनेसामने आले. त्यात दोनही वेळा मुंबईने चेन्नईला पराभूत केले आहे. तसेच मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या एकूण २६ सामन्यांमध्येही मुंबईच पुढे आहे. या सामन्यांपैकी मुंबईने १५ सामने जिंकले आहेत, तर ११ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर झालेल्या मुंबई चेन्नई सामन्यातही मुंबईने ४-२ अशी आघाडी राखली आहे.